▪️ जनसहभागाबरोबरच ‘टीम वर्क’मुळे विधानसभा निवडणूक टक्केवारीत वाढ- पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र कुमार सिंगल
▪️ मतदान टक्केवारी वाढविण्यात योगदान देणाऱ्या शिलेदारांचा सन्मान
नागपूर समाचार : निवडणूकांसारख्या आव्हानात्मक जबाबदाऱ्या समर्थपणे पेलण्यासह अधिकाधिक मतदान व्हावे यासाठी नागपूर जिल्ह्याने आपला वेगळा ठसा निर्माण केला. जिल्हा प्रशासनातील सर्व विभाग प्रमुख यांचा योग्य समन्वय, अधिकारी व कर्मचारी यांची दक्षता, पोलिस विभागातील सर्वांनी घेतलेली कर्तव्य तत्पर भूमिका यामुळे नागपूरला यश मिळाले असे प्रतिपादन पोलीस आयुक्त डॉ.रविंद्र कुमार सिंगल यांनी केले. जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर व सर्व टीम यांचे त्यांनी अभिनंदन केले.
जिल्हा नियोजन भवन येथे आज विधानसभा निवडणूकीत स्वीप उपक्रमांतर्गत उतकृष्ठ कार्य करणा-या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी परिश्रम घेतलेल्या अधिकारी व कर्मचारी यांना त्यांच्या योगदानाबद्दल सन्मान करताना मला आनंद होत आहे. विशेषत: पोलिस विभागालाही यात सन्मानित केले जात आहे याचे विशेष अप्रुप असल्याचे डॉ.सिंगल यांनी सांगितले.
ज्यांच्या समवेत आपण काम करतो त्यांना सन्मानित करण्याचा आनंद वेगळा – जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर
सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे नागपूर जिल्ह्याला राष्ट्रीय पातळीवर सन्मानित होण्याचा मान मिळाला. जिल्ह्याचा प्रशासकीय प्रमुख अर्थात जिल्हाधिकारी या नात्याने आम्ही तो सन्मान स्विकारला. मात्र, यात आपल्या सर्वांचे योगदान असून ज्या विभागातील अधिकारी, कर्मचारी यांनी ही जबाबदारी यशस्वीपणे पूर्ण केली त्यांचाही सन्मान व्हावा, अशी आमची भावना होती. आजच्या या कार्यक्रमातून आपल्या सर्वांना सन्मानित करता आले याचे समाधान असल्याची भावना जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांनी व्यक्त केली.
यश गाठण्यासाठी कप्तानाची भूमिका निर्णायक – अतिरिक्त मनपा आयुक्त अजय चारठाणकर
कोणत्याही यशासाठी केवळ चांगली टीम असून चालत नाही तर याला उत्तम कर्णधारही आवश्यक असतो. उत्तम कर्णधाराची भूमिका जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांनी निभावून उत्तम प्रशासनाचा अनुभव दिला आहे. निवडणुकाची जबाबदारी ही सर्वांच्या साक्षीने पार पाडल्या जाते. यात केंद्रीय निवडणूक आयोगाकडून दक्ष असलेले निरीक्षक हे कसलेल्या पंचाच्या भूमिकेत असतात. कुणाची विकेट केव्हांही जाऊ शकते अशा स्थितीत नागपूर जिल्हा प्रशासनातील सर्व टीमने एक आदर्श वस्तूपाठ घालून दिल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी यांनी स्वीप अंतर्गत घेतलेल्या उपक्रमांची माहिती देऊन पोलीस विभागातर्फे मिळालेल्या योगदानाच्या गौरव केला. पोलीस आयुक्त डॉ.सिंगल यांनी अनेकवेळा आपल्या पदाचा व वरिष्ठतेचा कोणताही बडेजाव न ठेवता सकाळपासून साथ देत वडीलकीच्या आदर्शतेचा प्रत्यय दिला या शब्दात त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
अधिकारी व कर्मचारी सन्मानित
निवडणूक प्रक्रियेत उत्कृष्ठ सहभागासाठी जिल्हा प्रशासनाला असलेला सन्मान डॉ. विपीन इटनकर, पोलिस विभागाला देण्यात येणाऱ्या सन्मानाचा स्विकार पोलीस अधीक्षक डॉ. हर्ष पोद्दार यांनी पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र कुमार सिंगल यांच्या हस्ते स्विकारला. स्वीपच्या उत्कृष्ट संयोजन व संचलनाबद्दल जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी यांना यावेळी डॉ. सिंगल याच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. स्वीप टीम समन्वयासाठी सहआयुक्त अजय चारठाणकर, निवासी उपजिल्हाधिकारी अनुप खांडे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रवीण महिरे, मनपा उपायुक्त रंजना लाडे, समाज कल्याण व विभागाच्या सहाय्यक आयुक्त सुकेशिनी तेलगोटे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास घोडके, जिल्हा उद्योग अधिकारी शिव कुमार मुद्दमवार, एलडीएम मोहीत गेडाम यांना सन्मानित करण्यात आले.
जिल्हा माध्यम प्रमाणिकरण व सनियंत्रण समितीची जबाबदारी सचिव या नात्याने जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार यांनी यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले. उत्कृष्ठ निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी संदीप भस्के, स्वाती देसाई, सुरेश बगळे, आकाश अवताडे, सचिन गोसावी, प्रियेश महाजन, तहसीलदार कल्याण कुमार दहाट, जितेंद्र शिकतोडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी कपिलनाथ कलोडे, गटविकास अधिकारी जयसिंग जाधव, बालासाहेब यावले, चेतन जाधव यांचा सन्मान करण्यात आला. तर विविध स्पर्धेचेही बक्षिस वितरण करण्यात आले. यात रील स्पर्धेत प्रथम अभिषेक केसकर, अझहर शेख द्वितीय तर हर्षल दांडेकर यांनी तृतीय क्रमांक प्राप्त केला. पोस्टर स्पर्धेत श्रृष्ठी वाकचौरे, कल्पक शेंडे, अयुश कांबळे यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक प्राप्त केला.
महानगरपालिकेचे जनसंपर्क अधिकारी मनीष सोनी, क्रीडा अधिकारी पियुष आंबुलकर, अंजली प्रसाद, दीपक मेहरकुरे, आरजे फरहान, पंकज जगताप आणि स्वीपच्या टीमला सन्मानित करण्यात आले.
टॅगलाईन स्पर्धेत अर्पिता यादव प्रथम, नंदा वासनिक यांनी द्वितीय तर अनुष्का अष्टनकर यांनी तृतीय क्रमांक मिळविला. बीएलओंनाही यावेळी सन्मानित करण्यात आले. यात त्रिलोक कुमार बागडे, प्रवीण वालुरकर, करुणा बारहाते, सोमेश्वर झोडे, सुदर्शन लाघवे, रजनी मारवाडी, सत्येन जगताप, वैष्णवी भोयर, बापुजी झाडे, पद्मा रामटेके, सुगंधा मारवाडी, सचिन चौहान यांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास घोडके यांनी केले तर आभार उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रवीण महिरे यांनी मानले.