* अभिनेत्री तेजश्री प्रधान, पूजा कुळकर्णी यांची उपस्थिती : नागपूरकरांची उत्स्फूर्त गर्दी
नागपूर समाचार : लेझीम, ढोल ताशा, शिवकालीन आखाड्यांची प्रस्तुती, ठिकठिकाणी सुबक रांगोळी आणि त्यासोबत ‘जय श्रीराम’चा जयघोष अशा चैतन्यपूर्ण वातावरणात व मराठमोळ्या थाटात रविवारी (३० मार्च) हिंदू नववर्षाचे स्वागत झाले.
श्री. सिद्धिविनायक सेवा ट्रस्ट आणि नववर्ष अभिनंदन समारोह समितीद्वारे लक्ष्मी नगर येथे गुढीपाडवा निमित्त नववर्ष स्वागत समारंभाचे आयोजन करण्यात आले. या सोहळ्याला विशेष अतिथी म्हणून सुप्रसिद्ध अभिनेत्री तेजश्री प्रधान आणि सुप्रसिद्ध अभिनेत्री पूजा कुळकर्णी यांची उपस्थिती होती.
रविवारी सकाळी तात्या टोपे नगर गणेश मंदिर ते आठ रस्ता चौक लक्ष्मी नगर पर्यंत भव्य शोभायात्रा काढण्यात आली. शोभायात्रेमध्ये अभिनेत्री तेजश्री प्रधान आणि पूजा कुळकर्णी यांनी सहभागी होऊन नागपूरकरांचे अभिवादन स्वीकारले. शोभायात्रेत ई-रिक्षांमधून गुलाब पाकळ्यांची उधळण करण्यात आली. डिजे, प्रभू श्रीराम, लक्ष्मण आणि सीतामाता यांच्या वेशभूषेतील मुले घोड्यावर स्वार होते. लेझीम, आखाडा, राम दरबार, ढोल ताशे, माहेश्वरी महिलांचा समूह, महादेव नंदी, झाकी, आदिवासी नृत्य, महाकाल, बाहुबली हनुमान अशा अनेक विशेषतःनी सजलेली शोभायात्रा पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. आठ रस्ता चौकामध्ये भव्य गुढी उभारण्यात आली. त्यालगत प्रभू श्रीमचंद्रांची भव्य मूर्ती दर्शनासाठी ठेवण्यात आली. यानंतर शोभायात्रेचे समापन झाले व लक्ष्मी नगर मैदानात सामूहिक रामरक्षा पठन व आरती झाली. कार्यक्रमात नूतनवर्ष अभिनंदन समारोह समितीचे श्री. पराग सराफ, श्री. प्रफुल्ल माटेगावकर उपस्थित होते.
लक्ष्मीनगर मैदानातील कार्यक्रमात अभिनेत्री तेजश्री प्रधान यांनी नागपूरकरांशी संवाद साधला. यंदाचा गुढीपाडवा नागपूरकरांसोबत साजरा होत असल्याने वर्षाची सुरुवात दमदार झाल्याचे सांगत त्यांनी नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. हिंदू धर्म आणि संस्कृती जतन करून त्याचा पुढच्या पिढीकडे पोहोचविणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. नववर्षाचा संकल्प करताना ही जबाबदारी व्यवस्थित सांभाळली जावी याकडे लक्ष देण्याची गरज आहे. तसेच नववर्षात स्वतःसह आपल्या परिसरातील नागरिकांची काळजी घेण्याचा संकल्प करून गुढी उभारूया, असे आवाहन अभिनेत्री तेजश्री प्रधान यांनी केले.
अभिनेत्री पूजा कुळकर्णी यांनी देखील नागपूरकरांना नूतनवर्षाच्या शुभेच्छा दिल्या. शोभायात्रेतील विविध झाकीचें त्यांनी कौतुक केले. नववर्ष स्वागतासाठी लहानथोरांची ऊर्जा ही प्रशंसनीय असल्याचेही त्या म्हणाल्या.
प्रास्ताविकामध्ये श्री. प्रफुल्ल माटेगावकर यांनी नववर्ष स्वागत समारंभाच्या आयोजनामागील आमदार श्री. संदीप जोशी यांची संकल्पना विषद केली. कार्यक्रमाचे संचालन श्री. नीरज दोंतुलवार यांनी केले.
नव वर्षाच्या स्वागत समारंभ आयोजनासाठी नुतनवर्ष अभिनंदन समारोह समितीचे सर्वश्री मनोज देशपांडे, गजानन निशीतकर, जयंता आदमने, शंतनू येरपुडे, कौस्तुभ खांडेकर, दर्शन पांडे, मनीष जैन, आशिष पुसदकर, प्रकाश रथकंठीवार, प्रफुल्ल माटेगांवकर, नीरज दोंतुलवार, अमोल वटक, अजय डागा, दिपक वानखेडे, मंगेश उपासनी, सौ. काजल बागडी, अनुसया गुप्ता, आनंद टोळ आदींनी अथक परिश्रम घेतले.