- Breaking News, नागपुर समाचार

नागपूर समाचार : नागपुरातील आध्यात्मिक परंपरेत भजन मंडळांचे मोठे योगदान – केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी

■ तबला-हार्मोनियमचे वितरण

नागपूर समाचार : नागपुरात सांस्कृतिक वातावरण निर्माण करण्यात आणि आध्यात्मिक परंपरा जोपासण्यात भजन मंडळांचे मोठे योगदान आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. श्री. नितीन गडकरी यांनी केले.

खासदार सांस्कृतिक महोत्सवाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात, ना. श्री. गडकरी यांच्या हस्ते नागपूर शहरातील ४०० भजन मंडळांना तबला व हार्मोनियमचे वितरण करण्यात आले. त्यावेळी ना. श्री. गडकरी बोलत होते. यावेळी भाजपचे नागपूर शहराध्यक्ष बंटी कुकडे, माजी आमदार प्रा. अनिल सोले, श्री. दीपक खिरवडकर, श्री. राजेश बागडी आदींची प्रमुख उपस्थिती होती. 

ना. श्री. गडकरी म्हणाले, ‘नागपुरातील सर्व धर्मीयांना त्यांच्या आध्यात्मिक परंपरा जोपासता याव्यात आणि उत्तम असे सांस्कृतिक व आध्यात्मिक वातावरण नागपुरात निर्माण व्हावे, या उद्देशातून हा उपक्रम राबविण्यात येतो. आपल्या आध्यात्मिक परंपराबद्दल तरुण पिढीमध्ये गोडी निर्माण होणे आवश्यक आहे. साहित्य मिळाल्यानंतर मंडळांमधील उत्साह वाढीस लागून त्यांच्या जीवनात भजनाच्या माध्यमातून आनंद निर्माण होणे, ही अत्यंत समाधानाची बाब आहे.’

नागपूर शहरातील शेकडो भजन मंडळांच्या माध्यमातून शहरात आध्यात्मिक वातावरणाची निर्मिती होत आहे. यातून पुढच्या पिढीमध्ये चांगले संस्कार रुजविण्याचे महत्त्वाचे कार्य होत आहे. सांस्कृतिक महोत्सवांतर्गत भक्ती महोत्सवाचे आयोजन करून जास्तीत जास्त नागपूरकरांना यामध्ये सामावून घेतले जाते. याशिवाय खासदार भजन स्पर्धाही दरवर्षी आयोजित करण्यात येते. नागपूर शहरातील पाचशेहून अधिक भजन मंडळांचा या स्पर्धेत दरवर्षी सहभाग असतो, याचाही ना. श्री. गडकरी यांनी उल्लेख केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *