नागपूर समाचार : जरीपटका परिसरात दीर्घकालीन व्हिसावर वास्तव्यास असलेल्या १८ पाकिस्तानी नागरिकांना नागपूर पोलिसांनी नोटीस बजावली आहे. यामध्ये एका ४ महिन्यांच्या चिमुकल्याचाही समावेश आहे.
केंद्र सरकारच्या निर्देशानंतर नागपूरमध्ये पोलिसांनी पाकिस्तानी नागरिकांच्या कागदपत्रांची तपासणी सुरू केली आहे. केंद्राने दिलेल्या आदेशानुसार भारतात वास्तव्यास असलेल्या सर्व पाकिस्तानी नागरिकांना ४८ तासांच्या आत देश सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
या कारवाईमुळे नागपूरमधील पोलिस यंत्रणा आणि गुप्तचर संस्थांमध्ये हालचालींना वेग आला आहे. सध्या या पाकिस्तानी नागरिकांच्या वैधतेची तपासणी सुरू असून, अनियमितता आढळल्यास तात्काळ कारवाई केली जाणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.