नागपूर : महाराष्ट्र शासनाव्दारे निर्गमित केलेल्या दिशा निर्देशानुसार नागपूर महानगरपालिकेने खाजगी रुग्णालयांनी कोव्हिड रुग्णांना उपचारासाठी दाखल करण्यापूर्वी मनपाला सूचना देण्याचे आदेश दिले आहेत. रुग्णालयांनी मनपाचे सूचनांचे पालन न केल्यास त्यांच्याविरुद्ध नर्सिंग होमचा परवाना रद्द करणे तसेच भा.दं.वि.संहिता आणि अन्य कायद्यांतर्गंत कारवाई केली जाईल, असे आदेश मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी जारी केले आहेत.
मनपा आयुक्त श्री. राधाकृष्णन बी यांनी निर्गमीत केलेल्या आदेशानुसार काही खासगी रुग्णालयांना डेडीकेटेड कोव्हीड हेल्थ केअर सेंटर घोषीत केले असून त्या रुग्णालयामध्ये ८० टक्के बेड्स कोव्हिड पॉझिटिव्ह रुग्णांसाठी राखीव ठेवणे गरजेचे आहे. यासोबतच त्यांना कोव्हिड रुग्णांकडून शासनाव्दारे निर्धारित दराप्रमाणे दर आकारण्याचेही आदेशात नमूद केले आहे. तसेच २० टक्के बेडस नान-कोव्हीडसाठी राखीव राहतील.
खासगी रुग्णालयांनी त्यांच्या रुग्णालयात दाखल रुग्णांची माहिती, रिक्त बेडची संख्या हे सुद्धा मनपाला कळविण्याचे आयुक्तांनी निर्देशीत केले आहे. कोव्हिड रुग्णांना दाखल करण्यापूर्वी मनपाला सूचित करणे आवश्यक आहे. जर कोरोना रुग्णांची प्रकृती चिंताजनक असेल तर रुग्णालय त्यांना दाखल करू शकतात. मात्र दाखल केल्यानंतर त्यांच्याबद्दल माहिती एक तासाच्या आत मनपाला देणे आवश्यक आहे. तसेच शासनाव्दारे निर्धारित केलेल्या दरानुसार बिल आकारावे, असेसुध्दा निर्देश म.न.पा. ने दिले आहे.
नागपूरात ६३७ खाजगी रुग्णालय आहेत पण कोव्हिड रुग्णांसाठी फारच कमी रुग्णालय समोर येत आहेत. महापौर श्री. संदीप जोशी आणि आयुक्त श्री. राधाकृष्णन बी यांनी खासगी रुग्णालयांना कोव्हिड ला नियंत्रणामध्ये आणण्यासाठी मदत करण्याचे आवाहन केले होते. परंतू रुग्णालयांनी या आवाहनाला योग्य प्रतिसाद दिला नाही. महापौरांनी मनपा प्रशासनाला प्रतिसाद न देणा-या रुग्णालयांविरुध्द कारवाई करण्याचे आदेशही दिले होते. कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता व शहरातील स्थिती पाहता खासगी रुग्णालयांनी कर्तव्य भावनेतून पुढे येण्याची गरज आहे, अशी भावना महापौर व आयुक्तांनी व्यक्त केली आहे.