‘कोव्हिड संवाद’मध्ये डॉ. विनोद गांधी व डॉ.पंकज अग्रवाल यांचे आवाहन
नागपूर : कोव्हिडचा संसर्ग वाढत आहे. नियम पाळनाचे वारंवार आवाहनही केले जात आहे. कोणत्याही प्रकारचे सौम्य लक्षण आढळल्यास त्वरीत चाचणी करून घेण्यासही सांगितले जात आहे. मात्र अनेक लोक त्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळेच कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. अनेक जण लक्षणे असूनही ती लपवतात तर अनेक जण लक्षणे नसल्यानंतर पॉझिटिव्ह असूनही सर्सास फिरतात ही अत्यंत धोकादायक बाब आहे.
आपल्याला लक्षणे नसली तरी आपण इतरांच्या जीवासाठी धोका आहोत ही बाब लक्षात घ्या. कोणत्याही लक्षणांकरिता स्वत:च्या मताने औषध घेउ नका, इंटरनेटवर सांगितले जाणारे उपचार करू नका. सध्याची परिस्थितीत बिकट आहे त्यामुळे कुठल्याही लक्षणांवर डॉक्टरांचा सल्ला घेउनच उपचार करा, असे आवाहन कलर्स चिल्ड्रेन हॉस्पिटलचे प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉ. विनोद गांधी आणि न्यूक्लीअस मदर अँड चाईल्ड सुपरस्पेशॅलिटी हॉस्पिटलचे संचालक तथा प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉ. पंकज अग्रवाल यांनी केले.
नागपूर महानगरपालिकेचे महापौर संदीप जोशी यांच्या संकल्पनेतून नागपूर महानगरपालिका आणि इंडियन मेडिकल असोशिएनशच्या संयुक्त विद्यमाने होम आयसोलेशनमध्ये असलेल्या कोव्हिड रुग्णांसाठी ‘कोव्हिड संवाद’ या शीर्षकांतर्गत शनिवारी (ता.१९) ‘फेसबुक लाईव्ह’च्या माध्यमातून त्यांनी शहरातील नागरिकांशी संवाद साधला.
यावेळी नागरिकांकडून येणा-या प्रश्नांना समर्पक उत्तरे देउन त्यांच्या शंकांचे निराकरण करण्यात आले. डॉ.विनोद गांधी म्हणाले, आज देशात ८० ते ९० टक्के लोकांना कोरोनाचा धोका नाही. ज्यांना आधीच काही मोठे आजार आहेत अशा १० टक्के लोकांनाच त्याचा जास्त धोका आहे. आपल्यामुळे आजार पसरू नये, इतरांना धोका होउ नये यासाठी सर्वोत्तम पर्याय १७ दिवस विलगीकरणात राहण्याचा आहे. लक्षणे नसताना किंवा सौम्य लक्षणे असताना विलगीकरणात राहणे आवश्यक आहे. यासाठी मनपाच्या कोव्हिड केअर सेंटरमध्ये व्यवस्था करण्यात आली आहे. घरी स्वतंत्र खोली आणि स्वतंत्र प्रसाधनगृह असल्यास घरीही विलगीकरणात राहता येईल. मात्र या काळात स्वत:ची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे.
कोणत्याही प्रकारचा शारिरीक त्रास जाणवू लागल्यास त्वरीत मनपाच्या किंवा आपल्या नजीकच्या डॉक्टरांशी फोनवरून संपर्क साधा. इंडियन मेडिकल असोसिएशनद्वारेही फोनवरून समुपदेशन सुविधा सुरू करण्यात आली आहे. तिथेही फोन करून माहिती देउ शकता. मात्र स्वत:च्या मताने कोणतेही प्रयोग करू नका. कोरोना पॉझिटिव्ह असून प्रसूत झालेल्या महिलांना बाळाला स्तनपान करता येईल मात्र त्यासाठी मास्क लावणे अत्यावश्यक आहे. कोरोनाचा संक्रमण मोठ्यांप्रमाणेच लहान मुलांनाही होतो त्यामुळे मुलांची सुद्धा विशेष काळजी घ्या, असेही त्यांनी सांगितले.
डॉ. पंकज अग्रवाल म्हणाले, खासगी रुग्णालयामध्ये रुग्णांना कोव्हिड उपचारासाठी आणले जाते तेव्हा त्यांचे सीटी स्कॅन केले जाते. अनेकदा यावर प्रश्न उपस्थित केले जातात. मात्र रुग्णाला कितपत धोका आहे. याचे निदान व्हावे यासाठी सीटी स्कॅन करणे अत्यावश्यक आहे. कोरोनाचा धोका वाढत आहे जोपर्यंत शहरातील किंवा देशातील शेवटची व्यक्तीचा अहवाल निगेटिव्ह येत नाही तोपर्यंत याचा धोका कायम राहणार आहे. त्यामुळे कोरोनाला गांभीर्याने घ्या. आपली बेजबादार वागणूक इतरांच्या जीवासाठी धोका ठरू नये, म्हणून जबाबदारीने वागा. प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी नियमीत व्यायाम करणे आवश्यक आहे. घरात असल्यास प्राणायाम करा. कोणत्याही प्रकारचा त्रास असल्यास किंवा आजार असल्यास व्यायाम करणे टाळा, हे सुद्धा अत्यंत महत्वाचे आहे. कोरोनाचा संसर्ग हा मृत व्यक्तीपेक्षा जीवंत व्यक्तीद्वारे जास्त प्रमाणात होतो. त्यामुळे नियमीत मास्कचा वापर करा, शारिरीक अंतर पाळा, वारंवार हात धुवा, बाहेर असल्यास सॅनिटायजरचा वापर करा. विशेष म्हणजे कोरोना बाधित व्यक्तींपासून शारिरीक अंतर पाळा पण मनातून त्यांच्याशी जवळ या, त्यांचे मनोबल वाढवा. आजारी व्यक्तीला मानसिक आधाराची खूप गरज असते तो आधार बना, असे आवाहनही डॉ. पंकज अग्रवाल यांनी केले.