विधानसभेचे विरोधी पक्षनेते यांनी कोव्हिडच्या संदर्भात घेतला मनपाचे कामाचा आढावा
नागपूर : नागपूर शहरातील कोव्हिडची स्थिती दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र या सर्वांमध्ये नागरिकांच्या तक्रारींचा ओघ कमी झाल्याचे दिसून येत आहे. चाचण्यांची संख्या, बेड्सची उपलब्धता, रुग्णवाहिका, कोव्हिड केअर सेंटर आणि इतर बाबी समाधानकारक आहेत. पुढील काही दिवसात आणखी रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. मात्र वाढत्या रुग्णसंख्येची चिंता न करता रुग्णांना उपचार मिळवून देणे, त्यांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग आणि इतर सर्व बाबींचे व्यवस्थापन कसे करता येईल, याकडे लक्ष द्या, असे सांगून शहरातील कोव्हिड संदर्भातील महानगरपालिकेचे कार्यात अजून सुधारणा करण्याची सूचना विधान सभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. त्यांनी मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या कार्याचे कौतुक केले आणि सांगीतले की, महापौर संदीप जोशी आणि मनपा आयुक्त सोबत कार्य करत आहे. यांचा चांगला संदेश नागरिकांमध्ये गेला आहे.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी (ता.२१) शहरातील कोव्हिड स्थितीचा आढावा घेतला. मनपा मुख्यालयातील आयुक्त कक्षात झालेल्या बैठकीत त्यांच्यासमवेत महापौर संदीप जोशी, माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार सर्वश्री गिरीश व्यास, नागो गाणार, कृष्णा खोपडे, विकास कुंभारे, उपमहापौर मनीषा कोठे, स्थायी समिती सभापती विजय (पिंटू) झलके, सत्तापक्ष नेते संदीप जाधव, मनपा आयुक्त राधाकृष्णन बी., ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी, अतिरिक्त आयुक्त सर्वश्री जलज शर्मा, राम जोशी, संजय निपाणे, उपायुक्त निर्भय जैन, प्रभारी उपायुक्त अमोल चौरपगार, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. संजय चिलकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. भावना सोनकुसळे, टाटा ट्रस्टचे डॉ. टिकेश बिसेन आदी उपस्थित होते.
यावेळी मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी शहरातील कोव्हिडची सद्यस्थिती आणि नागपूर महानगरपालिकेतर्फे सुरू असलेल्या उपाययोजनांची सादरीकरणाद्वारे माहिती दिली. ते म्हणाले, शहरातील महत्वाच्या आरोग्य सुविधा सुधारण्याकडे मनपाचे प्रयत्न सुरू आहेत. शहरातील सद्या ४२ खाजगी रुग्णालयांमध्ये कोव्हिड रुग्णांचे उपचार सुरू आहेत. इतरही रुग्णालयांमध्ये सेवा सुरू करण्याबाबत कार्य सुरू आहे. खाजगी रुग्णालयांकडून काढण्यात येणा-या देयकाचे बिलाचे ऑडिट (अंकेक्षण) करण्यासाठी ऑडिटर (अंकेक्षक) नियुक्त करण्यात आले आहेत. याशिवाय प्रत्येक झोनमध्ये प्रत्येकी ५ ॲम्ब्यूलन्स यासह एकूण ६५ रुग्णवाहिका नागरिकांच्या सेवेत आहेत. यामुळे रुग्णवाहिका उपलब्ध होत असल्याच्या तक्रारी कमी झाल्या आहेत. शहरात दररोज ६५०० ते ७ हजार कोव्हिड चाचण्या केल्या जात आहेत. यामध्ये आणखी आरटीपीसीआर चाचण्यांची संख्या वाढविण्यात येत आहे. कॉन्टॅक्ट ट्रेसिंगमध्ये येत असलेल्या त्रुट्यांमुळे मध्यंतरीच्या काळात अनेक अडचणी येत होत्या. त्याकडे कटाक्षाने लक्ष देउन आता कॉन्टॅक्ट ट्रेसिंग सुरळीत करण्यात आले आहे.
मनपाची रुग्णालये सज्ज असून वैद्यकीय कर्मचा-यांच्या अभावी ते सुरू करण्यास अडचण होती. यावरही उपाय शोधण्यात आले आहेत. रेल्वेने काही दिवसांपूर्वीच मनपाला रुग्णालय देण्याचे जाहिर केले होते. मात्र तांत्रिक अडचणीमुळे काही दिवस ते रुग्णालय सुरू न करता येउ शकल्याने तेथील वैद्यकीय चमू मनपाच्या सदर येथील आयुष रुग्णालयात सेवा देणार आहे. त्यामुळे मनपाच्या सदर येथील रुग्णालयात कोव्हिड उपचार केले जाईल. याशिवाय मनपाच्या आयसोलेशन हॉस्पिटलची जबाबदारी शहरातील साई मंदिर ट्रस्टने घेतली आहे. इंदिरा गांधी रुग्णालयातही उपचार सुरू करण्यात आले आहे. पाचपावली रुग्णालयात कोव्हिड पॉझिटिव्ह गरोदर मातांवर उपचार व त्यांची प्रसूती सुरू करण्यात आली आहे. इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो) येथील शिक्षण पूर्ण झालेले ६० डॉक्टर आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेडिकल) येथून शिक्षण पूर्ण केलेल्या २०० डॉक्टरांना लवकरच नियुक्ती देण्यात येत आहे. त्यामुळे महत्वाचा वैद्यकीय कर्मचा-यांचा प्रश्न सुटला आहे. सप्टेंबर महिन्याअखेरीस मनपाकडे मनपा रुग्णालयांचे ४०० बेड्स उपलब्ध होतील, असेही आयुक्तांनी यावेळी सांगितले.
‘जम्बो हॉस्पिटल’ ऐवजी छोट्या रुग्णालयांवर भर द्या
नागपूर शहरात ‘जम्बो हॉस्पिटल’ तयार करणे प्रस्तावित आहे. त्याचे काम लवकरच सुरू केले जाईल, अशी माहिती आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी बैठकीत दिली. शहरात ‘जम्बो हॉस्पिटल’ उभारण्याऐवजी २०० ते ३०० बेड्सची छोटी रुग्णालये उभारा, अशी सूचना यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. एकाचवेळी एक हजार किंवा त्यापेक्षा जास्त बेड्सचे ‘जम्बो हॉस्पिटल’ मध्ये व्यवस्थापनाच्या दृष्टीने त्यात अनेक अडचणी येतात. रुग्णांना उत्तम सुविधा मिळावी, रुग्ण तसेच वैद्यकीय चमूंचे कार्य सुरळीत चालावे यासाठी छोटी रुग्णालये तयार करा. त्यात आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून द्या. शहरातील काही रिकाम्या इमारतींचा यासाठी वापर करता आल्यास त्यादृष्टीने विचार करा, त्यामुळे झटपट कार्यवाही सुरू होईल, असेही ना. देवेंद्र फडणवीस म्हणाले.
बेड्सच्या उपलब्धतेचे ‘एसएमएस’ पाठवा
रुग्ण पॉझिटिव्ह आल्यानंतर ते मनपाच्या नियंत्रण कक्षात बेड्सच्या उपलब्धतेसाठी फोन करतात. त्यांची संबंधित रुग्णालयांची माहिती दिली जाते. मात्र प्रत्यक्ष हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर त्यांना परत पाठविण्याचा प्रकार घडतो. यावर उपाय म्हणून ‘एसएमएस’ प्रणाली अंमलात आणावी, अशीही सूचना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. यामध्ये रुग्णाने नियंत्रण कक्षात फोन करताच त्याची संपूर्ण माहिती मागवून घेणे, त्यानंतर त्याची ऑक्सिजनची स्थिती विचारणे, संबंधित रुग्णाला हॉस्पिटलमध्ये भरती करण्याची गरज असल्यास त्याला बेड्स उपलब्ध असणा-या संबंधित रुग्णालयाची माहिती देणे व लगेच त्यासंबंधी रुग्णाच्या मोबाईल नंबरवर त्यासंबंधीचे ‘एसएमएस’ पाठवायचे. ‘एसएमएस’ हे हॉस्पिटलमध्ये रुग्ण तातडीने दाखल करण्यासाठी ‘टोकन’ची भूमिका निभावेल व संपूर्ण प्रक्रियेत सुसूत्रता येईल, असेही ते म्हणाले.
‘कोव्हिड संवाद’ स्तूत्य उपक्रम
कोव्हिड संदर्भात नागरिकांमध्ये असलेली भीती आणि संभ्रम दूर करण्यासाठी मनपामध्ये महापौर संदीप जोशी यांच्या संकल्पनेतून ‘कोव्हिड संवाद’ हा फेसबुक लाईव्ह उपक्रम सुरू करण्यात आला आहे. यासंबंधी महापौर संदीप जोशी यांनी बैठकीत माहिती दिली. ‘कोव्हिड संवाद’मध्ये दररोज शहरातील विविध क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टरांना आमंत्रित केले जाते. संबंधित डॉक्टर यासंबंधी सविस्तर मार्गदर्शन करून नागरिकांच्या शंका आणि प्रश्नांचे निरसन करतात. या उपक्रमाला नागपुरकरांचा उत्तम प्रतिसाद मिळत असून तो पुढेही सुरू ठेवण्यात येणार आहे, असेही महापौरांनी सांगितले. आजच्या स्थितीत नागरिकांना योग्य माहिती मिळणे व त्यांना भेडसावणा-या समस्या सोडविण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध असणे अत्यावश्यक आहे. यासंबंधी नागपूर महानगरपालिकेने घेतलेला पुढाकार अत्यंत स्तूत्य आहे, अशा शब्दांत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ‘कोव्हिड संवाद’ची प्रसंशा केली. जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत हा कार्यक्रम पोहोचावा यासाठी त्यांच्या स्वत:च्या फेसबुक पेजवरूनही प्रसारीत करण्याची सूचना ना. देवेंद्र फडणवीस यांनी दिली.