‘कोव्हिड संवाद’ : डॉ. अश्विनी तायडे आणि डॉ. वंदना काटे यांनी केले शंकांचे निरसन
नागपूर : कोरोनाचा आलेख दिवसेंदिवस वाढतच आहे. आज कोणत्याही व्यक्तीकडून संसर्ग होउ शकतो अशी स्थिती निर्माण झाली आहे. मात्र काही बेजबाबदार नागरिक रस्त्यावरून, दुकानांमध्ये सर्रासपणे फिरत आणि वावरत आहेत. शासनाकडून, स्थानिक प्रश्नासनाकडून वारंवार मास्क लावण्याचे आवाहन केले जाते. त्यासाठी दंडही निश्चित करण्यात आला आहे. मात्र लोकांमध्ये जागरूकतेचा अभाव आहे. काही लोक हे जाणूनबुजून अशी वागणूक ठेवित आहेत. मात्र या अशा बेजबाबदारांमुळे इतरांचा जीव धोक्यात येण्याची वेळ आली आहे. कोरोनापासून बचाव करायचा असेत तर नियमांचे पालन करणे आवश्यक आहे, असे आवाहन किंग्जवे हॉस्पीटलच्या डॉ. अश्विनी तायडे आणि आय.एम.ए. महाराष्ट्र च्या उपाध्यक्ष डॉ. वंदना काटे यांनी केले.
नागपूर महानगरपालिकेचे महापौर संदीप जोशी यांच्या संकल्पनेतून नागपूर महानगरपालिका आणि इंडियन मेडिकल असोशिएनशच्या संयुक्त विद्यमाने होम आयसोलेशनमध्ये असलेल्या कोव्हिड रुग्णांसाठी ‘कोव्हिड संवाद’ या शीर्षकांतर्गत सोमवारी (ता.२१) ‘फेसबुक लाईव्ह’च्या माध्यमातून त्यांनी शहरातील नागरिकांशी संवाद साधला. यावेळी नागरिकांनी विचारलेल्या प्रश्नांची यावेळी डॉ. अश्विनी तायडे आणि डॉ. वंदना काटे यांनी उत्तरे देउन शंकांचे निरसन केले.
‘कोव्हिड संवाद’मध्ये बोलताना डॉ. अश्विनी तायडे म्हणाल्या, अनेक जण माझी प्रकृती सुदृढ आहे म्हणून मला कोव्हिड होउ शकणार नाही, या भ्रमात आहेत व ते सर्रासपणे नियम न पाळताच फिरत आहेत. ही एकदम चूकीची समजूत आहे. आपली ही वागणूक आपल्यासह इतरांच्या जीवालाही धोका निर्माण करणारी आहे. कारण आजघडीला नागपूर शहरासह संपूर्ण देशात लक्षणे नसलेल्या रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. यापैकी ज्यांनी चाचणी केली त्यांनाच आपण पॉझिटिव्ह असल्याचे समजले. मात्र ज्यांनी चाचणी केलीच नाही त्यांचा सगळीकडे वावर सुरू आहे. ही बाब भीतीदायक आहे. मात्र यावर उपाय आहे. सर्वांनी मास्क लावणे हा कोरोनापासून दूर राहण्याचा प्रभावी उपाय आहे. याशिवाय दर तासाला हात धुणे बाहेर असल्यास हँड सॅनिटायजरचा वापर करणे आणि महत्वाचे म्हणजे शारीरिक अंतर राखणे आवश्यक आहे. अमुक माझ्या जवळचा आहे म्हणून आपण सर्व नियम बाजूला ठेवणे अगदी चुकीचे आहे. त्यामुळे नियमांचे पालन करून स्वत: जागरूक राहा आणि इतरांनाही जागरूक करा, असे त्या म्हणाल्या.
यावेळी डॉ. वंदना काटे यांनी कोणतिही अतिसौम्य लक्षणे आढळल्यास त्वरीत चाचणी करण्याचा सल्ला दिला. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी आपल्याला कोरोना आहे आणि आपल्याला लक्षणे नसल्यास घरीच राहायचे आहे. ही बाब प्रत्येकाने लक्षात घेणे अत्यावश्यक आहे. स्वत:च्या मताने औषध घेउ नका किंवा ताप, सर्दी अंगावर काढू नका, त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्या. सावधगिरी बाळगणे ही आज आपली प्रत्येकाची जबाबदारी झाली आहे. प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी काय औषध घ्यावी असे अनेकदा प्रश्न येतात. नियमीत व्यायाम, योग, प्राणायाम यांनी प्रतिकारशक्ती वाढते. याशिवाय व्हिटॅमिन सी आणि डी चे सेवनही आरोग्यास उपायकारक आहे. कोणताही त्रास असल्यास किंवा आजार असल्यास व्यायाम, योग किंवा प्राणायाम करू नये, असाही सल्ला त्यांनी दिला. सुरूवातीला लोक चाचणी करायला घाबरायचे आता परिस्थिती बदलली आहे. साधा ताप असला तरी काही सुजाण नागरिक स्वत:च चाचणी करावी का असे विचारतात तर काही लक्षणे असूनही चाचणीसाठी घाबरतात. आपल्याला आपल्या आरोग्याप्रती सजग होणे आवश्यक आहे. कोरोना सर्वांसाठीच नवीन आहे. त्यामुळे त्याची काळजी घेणे आवश्यक आहे. त्यामुळे लक्षणे लपवू नका, चाचणी करा. चाचणी केल्यानंतरच निदान होतो, त्यामुळे पुढील उपचार करता येतो. समाजात यासंबंधी प्रत्येकाने जागरूकता पोहोचविणे आवश्यक आहे, असेही त्या म्हणाल्या.