आता प्रत्येक झोनमध्ये फिरते कोव्हिड-१९ चाचणी केंद्र
नागपूर : नागपूर शहरातील जास्तीत – जास्त नागरिकांची कोव्हिड चाचणी व्हावी यासाठी नागरिकांना त्यांच्या परिसरात सहजतेने चाचणीची सुविधा उपलब्ध करुन देणे गरजेचे होते. त्याकरिता मनपातर्फे प्रत्येक झोनमध्ये फिरत्या कोव्हिड चाचणी केंद्राची सुविधा करण्यात आली आहे. नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने मनपाच्या ‘आपली बसचे’ ढाच्यामध्ये किरकोळ परिवर्तन करून त्या बसेस ‘फिरते कोव्हिड चाचणी केंद्र’ म्हणून तयार करण्यात आल्या आहेत. अशा १२ बसेस सध्या सज्ज असून त्याचे महापौर संदीप जोशी व मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी आज हिरवी झेंडी दाखवून रवाना केले.
यावेळी बोलताना महापौर संदीप जोशी म्हणाले, आज शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या कमी होत आहे. मात्र धोका कमी झाला नाही. त्यामुळे चाचणीची संख्या वाढविणे आवश्यक आहे. अनेक लोक काही आजार, वृद्धापकाळ किंवा अन्य कारणाने चाचणी केंद्रावर चाचणीसाठी जाउ शकत नाही अशांसाठी या कोव्हिड चाचणी बसेस फायदेशीर ठरणार आहेत. नागपूर शहरातील कोणत्याही व्यक्तीने कोरोनाची लक्षणे लपवू नये, त्यांची वेळीच चाचणी होउन उपचार सुरू व्हावेत यादृष्टीने हा पुढाकार घेण्यात आला आहे.
राज्य शासनाच्या ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या अभियाना अंतर्गत शहरातील नागरिकांचे सर्वेक्षण सुरू असून त्यात एखाद्याला लक्षणे आढळल्यास त्यांची त्वरीत चाचणी करण्यास या बसेस महत्वाची भूमिका बजावणार आहेत. शहरातील दहाही झोनमध्ये प्रत्येकी एक बस उपलब्ध असून स्थानिक नगरसेवक व लोकप्रतिनिधींच्या सहकार्याने चाचणी केली जाणार आहे. शहर बसचा उपयोग कोव्हिड चाचणी केंद्रासाठी करणारी नागपूर महानगरपालिका ही राज्यातील पहिली महानगरपालिका असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.