कोव्हिडमध्ये घ्या डोळ्यांची विशेष काळजी : डॉ. राफत खान आणि डॉ. विरल शाह यांनी केले
नागपूर : कोव्हिड-१९ हा संसर्गजन्य आजार आहे. त्याचा संसर्ग तोंड आणि नाकाप्रमाणेच डोळ्यांमधूनही होतो. ताप, सर्दी, खोकला, श्वास घ्यायला त्रास यासह डोळे येणे हे सुद्धा कोव्हिडचे एक लक्षण असल्याचे दिसून येत आहे. याशिवाय कोव्हिडमुळे उद्भवलेले लॉकडाउन आणि ‘वर्क फ्रॉम होम’मुळेही डोळ्यांच्या अनेक समस्या वाढल्या आहेत. त्यामुळे डोळ्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष न करता डॉक्टरांचा सल्ला घ्या. कोव्हिडच्या या काळात नियमित मास्क लावा, याशिवाय डोळ्यांचीही काळजी घ्या, असा सल्ला प्रसिद्ध नेत्र शल्यचिकित्सक तथा ग्रीन सिटी हॉस्पिटलचे संचालक डॉ. राफत खान आणि प्रसिद्ध नेत्रतज्ज्ञ तथा नियाक्षी आय हॉस्पिटलचे डॉ.विरल शाह यांनी दिला.
महापौर संदीप जोशी यांच्या संकल्पनेतून नागपूर महानगरपालिका आणि इंडियन मेडिकल असोशिएनशच्या संयुक्त विद्यमाने ‘कोव्हिड संवाद’ या ‘फेसबुक लाईव्ह’ कार्यक्रमात डॉ. राफत खान आणि डॉ.विरल शाह यांनी आज ‘कोव्हिड आणि डोळ्यांची निगा’ या विषयावर मार्गदर्शन केले. यावेळी नागरिकांकडून विचारण्यात आलेल्या प्रश्नांची उत्तरे देत त्यांनी शंकांचे निरसरनही केले.
कोव्हिड हा अत्यंत धोकादायक आजार आहे. त्यामुळे त्याला अगदी सहज घेउ नका, त्याचे गंभीर परिणाम लक्षात घेउन काळजी घ्या, नियमांचे पालन करा. कोव्हिडमुळे ज्या पहिल्या डॉक्टरांचा मृत्यू झाला ते नेत्र शल्यचिकित्सक होते. त्यामुळे डोळ्यांमधून होणारा संसर्ग हा नाक आणि तोंडातून होणा-या संसर्गा एवढाच घातक आहे. त्यामुळे डोळ्यांमुळे संसर्ग होउ नये यासाठी विशेष काळजी घेणे अत्यावश्यक आहे. डोळ्यांना वारंवार हात लावणे टाळा.
अनेक जण ‘कॉन्टॅक्ट लेन्स’ लावतात मात्र ते लावताना आधीपेक्षा जास्त सुरक्षा घेणे गरजेचे आहे. कारण त्यामुळे कोव्हिड संसर्गाचा धोका निर्माण होतो. ‘कॉन्टॅक्ट लेन्स’ लावण्यापूर्वी साबणाने हात स्वच्छ धुवा, सॅनिटाजरचा वापर करून शक्यतो डोळ्यांना हात लावू नका. कोव्हिडच्या या संकटात शक्य असल्यास ‘कॉन्टॅक्ट लेन्स’ टाळा आणि चष्मा वापरा. चष्मा डोळ्यांना थेट संपर्कापासून सुरक्षित ठेवतो. स्वत:च्या मताने डोळ्यांबाबत कुठलेही उपचार करू नका, डॉक्टरांच्या सल्ल्यानेच उपचार करा. दवाखान्यात जाणे शक्य नसल्यास फोनवरून डॉक्टरांचा सल्ला घ्या, असेही आवाहन यावेळी डॉ. राफत खान आणि डॉ. विरल शाह यांनी केले.