गोंदिया : गोंदिया शहरातील अतिवर्दळीच्या गणेशनगर परिसरात असलेल्या आभूषण ज्वेलर्स येथे दिवसाढवळ्या सोन्याचांदीचे दागिने पळवून नेल्याची घटना घडली. सदर घटनेत सुमारे १0 लाख ९२ हजाराचे सोन्याचांदीचे दागिने पळवून नेल्याचे सांगितले जाते. सदर घटना सकाळी ११.३0 वाजताच्या सुमारास उघडकीस आली.
श्रीमंतांची वस्ती म्हणून ओळख असलेल्या शहरातील गणेशनगर येथे सोनी बंधू यांचे आभूषण ज्वेलर्स नावाने सोन्याचांदीचे दागिन्यांचे दुकान आहे. दुकानाचे मालक दीपक सोनी, संजय सोनी यांनी सकाळी दुकान उघडले. पैकी एक भाऊ कामानिमित्त बाहेर गेला. दुकानात संजय होता. दरम्यान तो लघुशंकेकरिता गेला असता अज्ञात चोराने संधी साधून दुकान प्रवेश करुन अंदाजे २५ लाख रुपये किमतीचे सोन्याचांदीचे दागिने पळवून नेले. प्रत्यक्षदश्रींच्या माहितीनुसार, हा चोर दुचाकीने आला होता. त्याच्यासोबत एक सहकारी असल्याचे सांगितले जाते. सदर घटना दुकानातील सीसीटीव्ही कॅमेर्यात चित्रित झाला आहे. या प्रकरणासंदर्भात शहर पोलिसात विचारणा केली असता, गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे स्टेशन डायरीवर कार्यरत पोलिस कर्मचार्यांनी सांगितले.