या थंडीत दान करा थोडीशी मायेची उब, नागपूर सिटिझन्स फोरमचे आवाहन, वाडी येथून ब्लॅंकेट वाटप उपक्रमाचा शुभारंभ
नागपूर :- समाजातील वंचित व गरजू लोकांना मदतीचा हात देण्यासाठी नागपूर सिटिझन्स फोरमने पुढाकार घेतला आहे. फुटपाथ व रस्त्याच्या कडेला राहून स्व कष्टाने जगणार्यांसाठी फोरमने उपक्रम हाती घेतला आहे. ” या थंडीत दान करा थोडीशी मायेची उब” असे आवाहन करत फोरमने समाजातील सक्षम व दानशूर व्यक्तींना मदतीसाठी आवाहन केले आहे. वाडी नाक्याजवळील रस्त्याच्या कडेला झोपडे टाकून छत्तीसगड येथील प्रवासी मजूर उदरनिर्वाह करतात. याठिकाणि जवळपास 20 कुटुंब आपल्या मुलाबाळांसह वास्तव्याला आहेत.
झाडू तयार करुन विकणे हा त्यांचा व्यवसाय आहे. पुरेशी मिळकत नसल्याने संसाराला उपयोगी साहित्य त्यांच्याकडे नाहीत. यातही थंडीपासून बचाव करण्यासाठी त्यांच्याकडे अंथरुण-पांघरुणाची वानवा आहे. त्यांची हीच गरज ओळखून फोरमने त्यांना मदत करण्याचे ठरविले.
रविवारी येथील 20 कुटुंबांना ब्लॅंकेट वितरीत करुन या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी या प्रकल्पाचे संयोजक प्रतिक बैरागी व अमृृता अदावडे व फोरमचे सदस्य अमित बांदूरकर, अभिजित सिंह चंदेल, गजेंद्र सिंग लोहिया, वैभव शिंदे पाटील, अभिजित झा व प्रा. विकास चेडगे हे उपस्थित होते.
“सामाजिक बांधिलकीचा भाग म्हणून नागपूर सिटिझन्स फोरमने हा उपक्रम हाती घेतला आहे. नागपूर शहरात किती व कुठल्या व्यक्तींना ब्लॅंकेट व गरम कपड्यांची आवश्यकता आहे याविषयी नागपूर सिटिझन्स फोरमने शहरात सर्वेक्षण करुन माहिती गोळा केल्याचे या प्रकल्पाचे संयोजक प्रतिक बैरागी यांनी सांगितले. समाजातील सक्षम व दानशूरांनी या उपक्रमास सढळ हाताने मदत करावी असे आवाहनही त्यांनी केले”.
“ज्या लोकांना शक्य आहे त्यांनी नवे ब्लॅंकेट व स्वेटर विकत घेऊन व ज्यांच्याकडे जुने असतील त्यांनी ते स्वच्छ करुन फोरमकडे द्यावे, आम्ही ते गरजूंपर्यंत पोहचवू असे प्रकल्पाच्या सह संयोजक अमृता अदावडे यांनी सांगितले. मायेची उब दान करुन नागपूरकरांनी यंदाची दिवाळी साजरी करावी असे आवाहन त्यांनी यावेळी केले”.
या उपक्रमाला हातभार लावण्यासाठी नागपूर सिटिझन्स फोरमने हेल्पलाईन जाहीर केली आहे. शहरातील दानदाते 8446018680, 7769081020 या क्रमांकावर संपर्क साधून मदत करु शकतात.