मेघे परिवार भाजपसोबतच : माजी खासदार दत्ता मेघे
पदवीधर मतदारसंघातील भाजपचे उमेदवार महापौर संदीप जोशी यांनी घेतली सदिच्छा भेट
नागपूर, ता. 13 : नागपूर पदवीधर मतदारसंघातील भाजपचे उमेदवार महापौर संदीप जोशी यांनी आज विदर्भातील ज्येष्ठ नेते माजी खासदार दत्ता मेघे यांची त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. मेघे परिवार भाजपसोबतच असून पदवीधर मतदारसंघातील भाजप उमेदवाराचा विजय पक्का आहे, असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला.
या भेटीच्या वेळी दत्ता मेघे यांचे पुत्र माजी आमदार सागर मेघे आणि हिंगणा विधानसभा क्षेत्राचे आमदार समीर मेघे उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना माजी खासदार दत्ता मेघे म्हणाले, समीर मेघे यांना भारतीय जनता पार्टीने दुसऱ्यादा उमेदवारी दिली आहे. ते मतदारसंघातील आपली जबाबदारी चोखपणे पार पाडत आहे. त्यांनी आपल्या कर्तृत्वाने मतदारसंघातील नागरिकांचा विश्वास संपादन केला. केंद्रीय मंत्री ज्येष्ठ नेते नितीनजी गडकरी आणि माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस या नेत्यांसोबत आम्ही सदैव आहोत. पदवीधर मतदारसंघातील बहुतांश मतदार हिंगणा मतदारसंघात आहे. मेघे समूहाच्या अनेक शैक्षणिक संस्थाही याच मतदारसंघात आहे. या संस्थांतील सारेच मतदार भाजपा उमेदवाराला पहिल्या पसंतीची मते देतील, असा विश्वास देत ‘विजयी भव’ असा आशीर्वाद महापौर संदीप जोशी यांना दिला.
महापौर संदीप जोशी यांनीही ज्येष्ठ नेते माजी खासदार दत्ता मेघे यांनी दिलेल्या विश्वासाबद्दल आभार व्यक्त केले.