नागपूर : देशाच्या सीमेवर आपले जवान अहोरात्र सीमा सांभाळत असून आज त्यांच्यासाठी सढळ हस्ते सशस्त्र ध्वजदिन निधी संकलीत करत संपूर्ण देश खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभा असल्याचा संदेश पोहचणे आवश्यक आहे. तसेच जिल्हा प्रशासन सैनिकांच्या कुटुंबियांच्या सदैव पाठीशी आहेत. अशा शब्दात जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी आज सैनिक कुटुंबियांना आश्वस्त केले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बचत भवन सभागृहात आयोजित सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलन कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, पोलीस उपायुक्त संदीप पखाले, अपर जिल्हाधिकारी श्रीकांत फडके, निवासी उपजिल्हाधिकारी रविंद्र खजांजी, जिल्हा सैनिक अधिकारी माजी मेजर डॉ. शिल्पा खरपकर, जिल्हा माहिती अधिकारी प्रविण टाके, कल्याण संघटक सत्येंद्रकुमार चौरे आदी यावेळी उपस्थित होते.
ठाकरे यांच्या हस्ते सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनाला सुरुवात करण्यात आली. यावेळी ते म्हणाले की, सेनेमुळे आपण सर्वजण सुरक्षित आहोत. सैनिक सीमेचे रक्षण करण्यासह दहशतवादी, मानवी आणि नैसर्गिक आपत्तीशी लढा देत असतात. त्यांच्यानंतर त्यांचे कुटुंबियांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण सर्वांनी त्यांना मदत केली पाहिजे. वीर जवानांच्या कुटुंबांच्या अडी-अडचणी सोडविणे तसेच त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचे पुनर्वसन करण्यासाठी दरवर्षी 7 डिसेंबरपासून ध्वजदिन निधी संकलनाला सुरुवात होते. ते पुढील वर्षीच्या नोव्हेंबर अखेरपर्यंत संकलन केले जाते.
गतवर्षी नागपूर विभागातून 1 कोटी 83 लाख 57 हजार रुपये निधीचे संकलन करण्यात आले असून 50 टक्के उद्दिष्टपूर्ती झाली होती. देशाच्या सीमेचे प्रतिकुल परिस्थितीत रक्षण करतांना त्यांच्या कुटुंबियांसोबत आम्ही आहोत ही भावना व्यक्त व्हावी यासाठी यावर्षी ध्वजदिन निधी संकलनाचे उद्दिष्ट 100 टक्के व्हावे, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. जिल्हास्तरावर त्याचे नियोजन करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.
याप्रसंगी जिल्हा सैनिक अधिकारी डॉ. खरपकर म्हणाल्या की, युध्दजन्य परिस्थितीत धारातिर्थी पडणाऱ्या सैनिकांच्या कुटुंबियांना तसेच अपंगत्व आलेल्या जवानांना आर्थिक मदत दिली जाते. ध्वजदिन निधीतून ग्रामीण भागातील माजी सैनिकांच्या पाल्यांना शहरात शिक्षणाची सोय उपलब्ध व्हावी यासाठी वसतिगृहे स्थापन करण्यात आली आहे.
मागील वर्षी नागपूर जिल्ह्यात 61 लाख 62 हजार निधी संकलित करण्यात आला. गतवर्षीच्या संकलीत ध्वजदिन निधीतून विविध कल्याणकारी योजनेंतर्गत माजी सैनिक, सैनिक विधवा, वीर पत्नी यांना आर्थिक मदत वाटप करण्यात आले. त्यामध्ये औषधोपचार 2 लाख 61 हजार, शालेय, महाविद्यालयीन शिक्षण 1 लाख 3 हजार 412, व्यावसायिक शिक्षण 36 लाख 95 हजार 973, शिष्यवृत्ती 4 लाख 17 हजार 500, चरितार्थ चालविण्यासाठी 2 लाख 62 हजार, अंत्यविधी करण्यासाठी 9 लाख 10 हजार आणि पाल्यांचे लग्न, वीरपत्नी व शौर्यपदक धारकांना एसटी प्रवास सवलतीसाठी 13 लाख 46 हजार अशा विविध योजनांच्या माध्यमातून 726 जणांना 69 लाख 96 हजार 76 रुपयांची आर्थिक मदत केल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.