- Breaking News, नागपुर समाचार

नागपुर : मनपातर्फे सशस्त्र क्रांतिकारक प्रभाकर देशपांडेचा स्नेहील सत्कार

नागपूर : भारताच्या स्वातंत्र्ययुद्धात सशस्त्र युद्धाचा सशक्त पर्याय निर्माण करणारे, स्वातंत्र्य चळवळीत स्वत:ला वाहुन घेणारे अग्रणी स्वातंत्र्यसैनिक क्रांतीकारक राजा उपाख्य प्रभाकर लक्ष्मण देशपांडे यांनी नुकतेच वयाच्या शंभराव्या वर्षात पदार्पण केले आहे. या स्वातंत्र्यसैनिकांचा सहृदय सत्कार उपमहापौर मनिषा कोठे, आमदार प्रवीण दटके, स्थायी समिती सभापती विजय (पिंटू) झलके, सत्तापक्ष नेते संदीप जाधव व ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी, नगरसेवक लखन येरावार यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन सोमवारी (७ डिसें.) केला.

धंतोली परिसरातील त्यांच्या राहत्या घरी सर्व पदाधिका-यांनी शाल, पुष्पगुच्छ व सन्मान चिन्ह देऊन त्यांचा भावपूर्ण सत्कार केला. यावेळी त्यांचे चिरंजीव उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश अजित देशपांडे व परिवारातील अन्य सदस्य उपस्थित होते. याप्रसंगी आमदार प्रवीण दटके यांनी त्यांना छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा देवून अभिष्टचिंतन केले.

यावेळी उपमहापौर मनिषा कोठे यांनी सांगितले की, स्वातंत्र्य काळातील एका पिढीच्या सर्वोच्च बलिदानामुळे आजचे स्वातंत्र्य आम्हाला मिळाले आहेत. याची जाणीव प्रत्येक भारतीयाने ठेवणे आवश्यक असल्याचे सांगितले. जुन्या पिढीच्या कार्यकर्तृत्वाला अभिवादन करण्यासाठी मनपा प्रशासनाच्या वतीने प्रभाकर देशपांडे यांचा सत्कार करीत असल्याचे त्यांनी सांगितले.

आपल्या वयाचे १२ व्या वर्षी महान क्रांतीकारक भगतसिंह यांच्या प्रेरणेनी राजा उपाख्य प्रभाकर लक्ष्मण देशपांडे यांनी 1942 मध्ये सशस्त्र क्रांतीच्या कार्यात स्वतःला वाहून घेतले होते. त्यांनी बॉम्ब बनविण्याचे प्रशिक्षण घेतले होते. नागपूरच्या इतिहासामध्ये तेलंगखेडी बॉम्ब खटला म्हणून ही घटना अधोरेखित आहे. यासाठी त्यांना दोन वर्षांचा तुरुंगवास झाला होता. विशेष म्हणजे त्यांचा जन्म धंतोली येथील याच घरात झाला आहे जिथे ते सध्या राहत आहे. त्यांचे एक चिरंजीव उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश आहेत. तर दुसरे चिरंजीव अनिल हे माजी रणजीपटू आहेत. तिसरा मुलगा संजय हे व्यावसायिक आहेत. त्यांना स्वातंत्र्य युद्धातील सक्रिय सहभागासाठी भारत सरकारतर्फे ताम्रपट व प्रशस्तीपत्र देऊन गौरान्वित करण्यात आले आहे. त्यांच्या पत्नी सौ. सुधा वयाच्या ९५ वर्षी ही सक्रिय आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *