नागपूर : महापालिकेच्या २०१७ ते २०२२ या कार्यकाळातील पहिल्या टर्ममध्ये सत्ताधारी भाजपतर्फे नंदा जिचकार यांना महापौरपद देण्यात आले. त्यांचा अडीच वर्षाचा कार्यकाळ संपल्यानंतर भारतीय जनता पक्षाकडून संदीप जोशी आणि दयाशंकर तिवारी यांना पुढील अडीच वर्षात सव्वा-सव्वा वर्षाचा कार्यकाळ देण्याचा निर्णय झाला. त्यानुसार, महापौर संदीप जोशी यांचा कार्यकाळ हा ८ जानेवारी रोजी संपत आहे. त्यानंतर शहराला दयाशंकर तिवारी हे नवे महापौर मिळतील. तत्पूर्वी जोशी महापौरपदाचा राजीनामा देतील. त्यानंतर तिवारी यांच्या निवडीचा प्रस्ताव सभागृहात येईल.
नंदा जिचकार यांचा कार्यकाळ हा सप्टेंबर महिन्यात संपला. कोरोनामुळे त्यांना तीन महिन्याचा कार्यकाळ अतिरिक्त मिळाला. नोव्हेंबरपर्यंत त्या या पदावर होत्या. यानंतर नव्या महापौर पदासाठी मतभेद होते. संदीप जोशी आणि दयाशंकर तिवारी यांनी या पदाकरिता दावेदारी केली होती. परिणामी, या पदाकरिता मध्यम भूमिका घेण्यात आली. त्यानुसार प्रथम संदीप जोशी यांना संधी देण्यात आली. आता त्यांचा कार्यकाळ संपत असल्यामुळे दयाशंकर तिवारी यांना संधी आहे. तिवारी हे शहराचे ५४ वे महापौर असतील. याकरिता आवश्यक प्रक्रिया पूर्ण करायची असेल. ते झाल्यानंतर दयाशंकर तिवारी हे पदभार स्वीकारतील. जोशी यांनी राजीनामा दिल्यानंतर सभागृहात प्रस्ताव पाठविण्यात येईल. येथे तिवारी यांची निवड होईल. पक्षाकडून यासंदर्भातील घोषणा यापूर्वीच केली आहे.