नागपूर : अवघ्या चार दिवसांची चिमुकली, नावही ठेवले नाही. एकीकडे जन्माचा आनंद साजरा करतानाच अचानक दुःखाचे सावट पसरले. बाळाची अन्ननलिका आणि श्वासनलिका जुळलेली होती. दूध, पाणी पचत नव्हते. नातेवाईकांनी तर बाळाच्या जगण्याची आस सोडून दिली होती. मात्र, देव तारी त्याला कोण मारी असे म्हणतात ते खरे ठरले. मेडिकलमधील बाळशल्यक्रिया विभागातील डॉक्टर देवदूत ठरले. त्यांच्या शर्थीच्या प्रयत्नातून दुर्मिळ शस्त्रक्रिया यशस्वी झाली. बाळाला नवजीवन मिळाले. सध्या मेडिकलमधील वार्ड क्रमांक ३ मध्ये बाळ ठणठणीत आहे. आता बाळाचे वय सहा दिवसांचे आहे.
नागभीड येथील आरोग्य केंद्रात या बाळाचा जन्म झाला. प्रिया आणि स्वप्नील असे या बाळाच्या आईवडिलांचे नाव आहे. स्वप्नील शेतकरी आहेत. शुक्रवार ९ डिसेंबर रोजी बाळाचा जन्म झाल्याचा आनंद उपभोगत असतानाच डॉक्टरांनी अन्ननलिका व श्वासनलिका जुळून असल्याचे सांगितले.
बाळाच्या शरीरात गुंतागुंत झाली. दूध किंवा पाणी पिल्यानंतर ते पाचट नव्हते. बाहेर पडत होते. त्यामुळे नागभीड येथील डॉक्टरांनी नागपूर येथील एका खासगी रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला. पण या रुग्णालयात येणार खर्च या कुटुंबाच्या आवाक्यात नव्हता. यामुळे आईवडिलांनी अखेर मेडिकल गाठले. एक्स-रे, सोनोग्राफीतून गुंतागुंत असल्याचे समजले. मेडिकलमधील बालशल्यक्रिया विभागातील डॉक्टरांनी तत्काळ शस्त्रक्रिया केली. शस्त्रक्रियेनंतर बाळाला सलाईन लावण्यात आली. सध्या बाळ ठणठणीत आहे. वार्ड क्रमांक ३ मध्ये बाळावर उपचार सुरु आहेत.
दोन दिवसांच्या बाळावर केलेली शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याची माहिती डॉक्टरांनी नातेवाईकांना दिली. नातेवाईकांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. नातेवाईकांच्या तोंडातून शब्द फुटत नव्हते. डॉक्टरांचे आभार कसे मानावे हेच कळत नव्हते. वडील स्वप्नील यांनी हात जोडून डॉक्टरसाहेब असे शब्द उच्चरले. आणि त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. स्वप्नील यांनी मनातून डॉक्टरांचे आभार मानल्यामुळे डॉक्टरांचेही डोळे भरून आले.