नागपूर : पाटना महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त शीला इराणी यांच्या नेतृत्वात प्रमुख अधिकाऱ्यांनी बुधवारी (ता.१७) नागपूर शहराला भेट दिली. भेटीदरम्यान शिष्टमंडळाने नागपूर शहरात सुरू असलेल्या विविध प्रकल्पांची माहिती घेतली व प्रकल्पांना भेट दिली.
पाटना महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्तांसह पाटना स्मार्ट सिटीचे मुख्य महाव्यवस्थापक सुधीर साहु, शिशीर कुमार, राजकुमार सुमन, शहर व्यवस्थापक अरविंदकुमार हे नागपूर शहरातील प्रकल्प पाहणी संदर्भात दोन दिवसीय दौऱ्यावर शहरात आले आहेत. बुधवारी (ता.१८) शिष्टमंडळाने मनपा मुख्यालयामध्ये अतिरिक्त आयुक्त जलज शर्मा व अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांची भेट घेतली. मनपाच्या छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीतील आयुक्त सभागृहामध्ये शिष्टमंडळासोबत बैठक घेण्यात आली. अतिरिक्त आयुक्त जलज शर्मा यांनी नागपूर शहरातील विविध प्रकल्पांची शिष्टमंडळाला माहिती दिली. यावेळी मुख्य लेखा व वित्त अधिकारी विजय कोल्हे, महाव्यवस्थापक (मोबिलिटी) राजेश दुफारे, परिवहन व्यवस्थापक शकील नियाजी आदी उपस्थित होते.
नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी बी. यांनी स्मार्ट सिटी अंतर्गत शहरात सुरू असलेल्या आणि भविष्यात प्रस्तावित विविध प्रकल्पांची शिष्टमंडळाला माहिती दिली. स्मार्ट सिटी कार्यालयामध्ये सादरीकरणाद्वारे संपूर्ण प्रकल्प आणि प्रक्रिया समजावून सांगण्यात आली. पारडी, पुनापूर, भरतवाडा, भांडेवाडी येथील क्षेत्राधिष्ठीत विकास प्रकल्प मध्ये ५१ किमी लांबीचे मार्ग, होम-स्वीट-होम आदी प्रकल्पांची माहिती त्यांना देण्यात आली.
मनपा मुख्यातील ‘श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी सिटी ऑपरेशन सेंटर’ (सीओसी)ला यावेळी शिष्टमंडळाने भेट दिली. सीओसी मधील संपूर्ण प्रक्रिया त्यांनी समजावून घेतली व संपूर्ण प्रणालीचे पाटना महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त शीला इराणी यांच्यासह सर्व मान्यवरांनी कौतुक केले. यावेळी ई-गव्हर्नन्सचे महाव्यवस्थापक डॉ.शील घुले, स्मार्ट सिटीच्या आरती चौधरी उपस्थित होते.
शिष्टमंडळाने नागपूर शहरातील बेसा मार्गावरील इथेनॉल प्रकल्प, मनपाचे सिवरेज ट्रिटमेंट प्रकल्प, बायो मायनिंग प्रोजेक्ट, बीएसयूपी या प्रकल्पांचीही पाहणी केली.