महामेट्रोकडे शहर बस संचालनाच्या हस्तांतरणाला परिवहन समितीची मंजुरी
नागपूर, ता. २५ : नागपूर शहर बस सेवा संचालन महामेट्रोकडे हस्तांतरीत करण्याच्या प्रस्तावाला परिवहन समितीने मंजुरी प्रदान केली आहे. गुरूवारी (ता.२५) मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहामध्ये परिवहन समितीची विशेष बैठक घेण्यात आली.
बैठकीत समिती सभापती नरेंद्र (बाल्या) बोरकर यांच्यासह सदस्या व उपमहापौर मनीषा धावडे, सदस्य नितीन साठवणे, नरेंद्र वालदे, नागेश मानकर, सदस्या रूपाली ठाकुर, वैशाली रोहनकर, विशाखा बांते, अर्चना पाठक, प्रभारी परिवहन व्यवस्थापक शकील नियाजी, प्रशासकीय अधिकारी रवींद्र पागे, उपअभियंता केदार मिश्रा, श्रम अधिकारी अरुण पिपरुडे, लेखा अधिकारी विनय भारद्वाज, तांत्रिक पर्यवेक्षक योगेश लुंगे आदी उपस्थित होते.
अटी व शर्तीसह महामेट्रोला परिवहन सेवा हस्तांतरित करण्याबाबत धोरण निश्चित करून त्यास बैठकीत मंजुरी प्रदान करण्यात आली. संपूर्ण विषयाच्या अनुषंगाने धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी महासभेपुढे विषय सादर करण्याचे एकमताने परिवहन समितीद्वारे निर्णय घेण्यात आला.
मनपाच्या शहर बस सेवेमध्ये २३७ स्टँडर्ड डिझेल बसेस, ६ महिलांसाठी विशेष ‘तेजस्विनी’ बसेस, १५० मिडी बसेस व ४५ मिनी बसेस अशा एकूण ४३८ बसेस आहेत. या सर्व बस महामेट्रोकडे हस्तांतरीत करण्यात येणार आहेत. या सर्व बसेसचे योग्य संचालन करून शहरातील नागरिकांच्या सुविधेच्या दृष्टीने त्या सुरळीत सुरू राहाव्यात याबाबत परिवहन समिती सभापती नरेंद्र (बाल्या) बोरकर यांनी सूचना केली.
सर्व बसेस हस्तांतरीत करताना त्यासोबत संपूर्ण यंत्रणाही हस्तांतरीत केली जात आहे. यामध्ये मनपाचे परिवहन विभागाचे सर्व कर्मचारी व संगणक ऑपरेटर्सचाही समावेश असल्याचे त्यांनी सांगितले. शहर बसचे व्यवस्थित संचालन व्हावे याकरिता महामेट्रोकडे मनपाचे निवडक पदाधिकारी विश्वस्त म्हणून कार्यभार पाहतील, अशी सूचनाही यावेळी सदस्यांद्वारे मांडण्यात आली.
नरेंद्र बोरकर यांच्यासह सहा सदस्य होणार निवृत्त
परिवहन समितीच्या एकूण १३ सदस्यांपैकी निम्मे म्हणजे सहा सदस्य १ मार्च रोजी निवृत्ती होणार आहेत. निवृत्त होणा-या सदस्यांमध्ये परिवहन समिती सभापती नरेंद्र (बाल्या) बोरकर यांच्यासह सदस्या मनीषा धावडे, अर्चना पाठक, वैशाली रोहनकर, सदस्य नितीश ग्वालबंशी, नितीन साठवणे यांचा समावेश आहे. निवृत्त झालेल्या सदस्यांच्या जागेवर मनपाची महासभा नवीन सदस्यांची नियुक्ती करेल.