- नागपुर समाचार, मनपा

गृहविलगीकरणातील रुग्णांवर ‘वॉच’ ठेवा, कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर भर द्या! आरोग्य सभापती महेश महाजन यांचे निर्देश : व्यवस्थेचा घेतला आढावा

Nagpur:- कोरोनाचा वाढता संसर्ग चिंताजनक आहे. यावर वेळीच उपाययोजना केल्या नाहीत तर पुढे गंभीर परिस्थिती उद्‌भवेल. त्यामुळे गृहविलगीकरणात असलेल्या रुग्णांवर विशेष लक्ष ठेवा. ते बाहेर पडणार नाही याची काळजी घ्या. कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढवून वेळीच चाचण्या करून घ्या. जेणेकरून कोरोना नियंत्रणात आणता येईल, असे निर्देश आरोग्य समितीचे सभापती महेश महाजन यांनी दिले.

नागपूर महानगरपालिका मुख्यालयातील आरोग्य समिती सभापतींच्या कक्षात आरोग्य समितीची बैठक पार पडली. यावेळी ते बोलत होते. बैठकीला सभापती महेश महाजन यांच्यासह उपसभापती जगदीश ग्वालबंशी, सदस्य नागेश मानकर, भाग्यश्री कानतोडे, भावना लोणारे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. संजय चिलकर, घनकचरा व्यवस्थापन उपायुक्त डॉ. प्रदीप दासरवार, कार्यकारी अभियंता सोनाली चव्हाण, सहाय्यक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय जोशी, पशुचिकित्सक अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले आदी उपस्थित होते.
आरोग्य सभापती महेश महाजन यांनी यावेळी कोरोनासंदर्भात प्रशासनातर्फे करण्यात आलेल्या आणि प्रस्तावित व्यवस्थेचा आढावा घेण्यात आला. मनपाच्या पाचपावली सुतिकागृह, इंदिरा गांधी रुग्णालय, आयसोलेशन हॉस्पीटल हे रुग्णालय आता कोव्हिड रुग्णालय म्हणून कार्यरत असून आयुष रुग्णालयात पुढील दोन दिवसात ४० खाटांची व्यवस्था करण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. या रुग्णालयांमध्ये ज्यांना व्हेंटिलेटरची आवश्यकता नाही अशा रुग्णांना भरती करता येईल. शिवाय मेडिकल, मेयोमधील असे रुग्ण या रुग्णालयांमध्ये पाठविण्यात येतील. मनपाच्या या रुग्णालयांत येणाऱ्या गंभीर रुग्णांना मेडिकल, मेयोमध्ये पाठविण्यात येईल, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.
कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर बहुतांश रुग्णांना गृहविलगीकरणाचा सल्ला देण्यात येतो. मात्र, गृहविलगीकरणाचे नियम संबंधित रुग्ण पाळत आहेत की नाही, यावर यंत्रणेने लक्ष ठेवावे. पॉझिटिव्हचा अहवाल आल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी रुग्णांना औषधे मिळायला हवी. कोरोना नियंत्रण कक्षातून रिक्त खाटांची अद्ययावत माहिती नागरिकांना मिळायला हवी, त्यादृष्टीने नियोजन करण्याचे निर्देश सभापतींनी दिले. शहरातील स्वच्छतेवर विशेष लक्ष ठेवावे. त्यात जर कोणी कुचराई करत असेल तर त्यांच्यावर कार्यवाही करावी, असेही निर्देश त्यांनी यावेळी दिले.
यावेळी आरोग्य विभागाच्या (स्वच्छता) कामकाजाचाही त्यांनी आढावा घेतला. कोरोनासंदर्भातील व्यवस्थेसंदर्भात समितीच्या सदस्यांनी केलेल्या सूचनांचे स्वागत करीत त्यादृष्टीने नियोजन करण्याचे निर्देशही सभापती महेश महाजन यांनी दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *