नागपूर : नासुप्र ले-आउट मधील व शहरी भागातील प्रलंबित बांधकाम नकाशे दोन महिन्याच्या आता शासनाच्या दिशानिर्देशानुसार मंजूर करा असे निर्देश स्थापत्य व प्रकल्प विशेष समितीचे सभापती राजेन्द्र सोनकुसरे यांनी नगररचना विभागाला दिले. ५७२ अंतर्गत येणाऱ्या ले-आउट मधील बांधकाम नकाशे मुदतीत मंजूर होत नसल्याच्या तक्रारीवरून सभापतींनी संबंधित निर्देश दिले आहेत. गुरूवारी (ता. ८) मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहामध्ये स्थापत्य व प्रकल्प विशेष समितीची ऑनलाईन पध्दतीने बैठक पार पडली.
बैठकीत स्थापत्य व प्रकल्प विशेष समितीचे उपसभापती निशांत गांधी, सदस्या वैशाली रोहणकर, रूपा राय, वंदना चांदेकर, उपायुक्त (महसुल) मिलींद मेश्राम, उद्यान अधिक्षक अमोल चौरपगार, नगररचना विभागचे सहायक संचालक हर्षल गेडाम, स्थावर अधिकारी राजेन्द्र अंबारे, दहाही झोनचे सहायक आयुक्त आदी उपस्थित होते.
स्थापत्य व प्रकल्प विशेष समितीचे सभापती राजेन्द्र सोनकुसरे म्हणाले, बांधकाम नकाशासाठी आलेल्या अर्जांची तपासणी करून १५०० चौ.मी. पर्यंतच्या भूखंडाच्या नकाशाबाबत आयुक्तांशी चर्चा करून त्यांच्या परवानगीने संबंधित नकाशांना मंजूरी देण्यात यावी.
आतापर्यंत नगररचना विभागाला बांधकाम नकाशासाठी एकूण ३९२५ अर्ज प्राप्त झाली आहेत. यापैकी १९९८ अर्ज मंजूर तर १२१ अर्ज नामंजूर करण्यात आली आहेत. तसेच १६२२ अर्ज प्रलंबित आहेत. याशिवाय आर.एल साठी १६०६ अर्ज प्राप्त झाले आहेत. यापैकी ६३८ अर्ज मंजूर आणि २४ अर्ज नामंजूर करण्यात आले आहेत. तर ३०३ अर्ज प्रलंबित आहेत अशी माहीती नगररचना विभागाचे सहायक संचालक हर्षल गेडाम यांनी यावेळी दिली.
शहरात दहा झोन अंतर्गत येणाऱ्या मनपाच्या खुल्या जागांवर सुरक्षा भिंत आणि सूचना फलक लावण्याचे निर्देश सभापतींनी यावेळी दिले. तसेच शहरातील ज्या जागा अजूनही मनपाच्या नावावर झालेल्या नाहीत त्या मनपाच्या नावावर करण्याचे दृष्टीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. यासंबंधिचा संपूर्ण अहवाल आणि सुरक्षा भिंत आणि सूचना फलकाच्या फोटो सहित दोन आठवड्याच्या आत समितीपुढे सादर करण्याचे निर्देशही सभापतींनी दिले.
उन्हाळ्यात पाणी टंचाई बघता शहरात रस्त्याच्या कडेला ‘रेन वाटर हार्वेस्टिंग’ची यंत्रणा उभी करता येईल का यावर वरिष्ठांशी चर्चा करण्याची सूचना सभापतींनी केली. यासंदर्भात वरिष्ठांशी चर्चा करून एक योजना आखण्यात यावी आणि यासंबंधी ‘रोल मॉडेल’ तयार करून लवकरात लवकर समितीला सादर करावा असेही ते म्हणाले.
झोन स्तरावर मनपाचे उत्पन्न वाढविण्यासाठी होर्डिंग्जसाठी नविन जागा शोधाव्यात, शहरात असणाऱ्या अवैध टॉवरवर कारवाई करावी आणि रहदारीला अडथळा निर्माण करणाऱ्या झाडांसंदर्भात आयुक्तांकडून मंजूरी घेउन लवकरात लवकर नागरिकांसाठी रस्ता मोकळा करून देण्याच्या सूचनाही यावेळी सभापतींनी केल्या.