चंद्रपूर, ता. 23 : चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या वतीने मान्सूनपूर्व नाले स्वच्छता अभियानाला सुरुवात झाली आहे. पावसाळा सुरू होण्याआधी सर्व नाल्यांची सफाई करून पावसाचे पाणी सुरळीत वाहण्यास मोकळे केले जाणार आहेत. हे स्वच्छता अभियान महापौर राखी संजय कंचर्लावार, आयुक्त राजेश मोहिते, उपमहापौर राहुल पावडे आणि स्थायी समिती सभापती रवी आसवानी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
महापौर राखी संजय कंचर्लावार यांच्या संकल्पनेने यावर्षी सुध्दा पावसाळा सुरु होण्याआधीच मनपाव्दारे नाले स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. यावर्षी नदी स्वच्छता अभियान अंतर्गत नाल्यांची रूंदी व खोली पूर्णपणे स्वच्छ करून पावसाळी पाणी वाहण्याकरीता सुरळीत प्रवाह करण्यात येईल. याद्वारे वाहणाऱ्या पाण्याची क्षमता वाढेल आणि नाल्यांच्या काठावर असलेल्या वस्त्यांत पावसाळ्यात येणाऱ्या पूरापासून सुरक्षा प्रदान होईल.
शहरातील मोठ्या नाल्यांची तसेच लहान नाल्यांची साफ सफाई सुरू असून मनुष्यबळ व जेसीबीच्या मदतीने गाळ आणि कचरा बाहेर काढण्यात येत आहे. तसेच नाल्याभोवती वाढलेली झाडेझुडपी व नाल्यातील दगड बाहेर काढून सांडपाण्याला वाट काढून दिली जात आहे. 111 अतिरिक्त मनुष्यबळ, तीन जेसीबी, एक पोकलन, 2 ट्रॅक्टर आणि 2 टिप्परच्या सहाय्याने हे नाले स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे.