नाशिक दि. 21 : कोरोनाचा फैलाव वाढत असताना या संकटाशी एकजुटीने लढा दिला जात असताना नाशिक महानगरपालिकेच्या झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजनची गळती होऊन झालेल्या दुर्घटनेत २२ रुग्णांनी आपला प्राण गमावला असून ही घटना अतिशय दुर्दैवी असुन रुग्णालयात घडलेल्या प्रकारामुळे मन सुन्न झाले, दुःख व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत अशा भावना राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केल्या आहेत.
छगन भुजबळ हे आज सकाळी मुंबईहून नाशिकच्या दिशेने निघालो असताना दुपारी १२.३० च्या सुमारास नाशिक महानगरपालिकेच्या झाकीर हुसेन रुग्णालयाच्या ऑक्सिजन टाकीमध्ये टँकरच्या माध्यमातून रिफिलिंग करत असतांना ऑक्सिजन गळतीची झाल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यानंतर त्यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन रुग्णालयाची पाहणी केली. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून या संपूर्ण प्रकरणाची माहिती घेतली तसेच मृतांच्या नातेवाईकांशी चर्चा करून त्यांचे सांत्वन केले. त्यानंतर त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी माजी खासदार समीर भुजबळ, मनपा आयुक्त कैलास जाधव, वैद्यकीय अधिकारी डॉ.बापूसाहेब नगरगोजे, डॉ.आवेश पलोड, रंजन ठाकरे यांच्यासह वैद्यकीय अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, कोरोनाविरुद्धचा लढा एकजुटीने लढला जात असतांना नाशिक महानगरपालिकेच्या झाकीर हुसेन रुग्णालयात घडलेली ही घटना अतिशय दुःखद घटना आहे. या रुग्णालयाची क्षमता एकूण १५० इतकी असून रुग्णसंख्या अधिक असल्याने या रुग्णालयात एकूण १५७ रुग्णांवर उपचार सुरू होते. त्यात १३१ ऑक्सिजनवर तर १५ रुग्ण व्हेंटिलेटरवर उपचार घेत होते. या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या १५७ रुग्णांपैकी ६३ अतिशय आजारी होते. १२.३० सुमारास याठिकाणी गॅस गळतीची घटना घडली. त्यानंतर १.३० वाजेपर्यंत पुन्हा जोडणी करण्यात आली. या दरम्यान दुर्दैवाने यात २२ लोक मृत्युमुखी पडले असून ११ व्हेंटिलेटरवर असलेल्या रुग्णांचा तर ११ ऑक्सिजन वर असलेल्या रुग्णांचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले.
ते म्हणाले की घटना घडल्यानंतर तातडीने याठिकाणी ड्युरा सिलेंडर व जम्बो सिलेंडर मागविण्यात येऊन रुग्णांवर उपचार करण्यात आले तर पाच रुग्णांना इतर रुग्णालयात हलविण्यात आले आहे. तर ऑक्सिजन पुरवठा सुरळीत होऊन पुन्हा एकदा रुग्णांवर योग्य ते उपचार करण्यात येत आहे. कोरोनाविरुद्ध लढाई लढत असताना ही अत्यंत दुर्दैवी घटना घडली असून राज्य शासनाकडून या घटनेचा तपास करण्यासाठी उच्चस्तरीय समिती नेमण्यात येणार आहे. समितीमध्ये एक आयएएस अधिकारी एक इंजिनिअरिंग क्षेत्रातील तज्ञ आणि एक सिनियर डॉक्टरचा समावेश असणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना राज्य शासनाकडून प्रत्येकी ५ लाख व नाशिक महापालिका यांच्याकडून प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत करण्यात येईल. या घटनेची चौकशी पूर्ण झाल्यानंतर दोषी असणाऱ्यांवर योग्य ती कारवाई करण्यात येईल. आपलं काम थांबणार नाही. अधिक नियोजन करून लढा सुरू राहील. या घटनेचा धडा घेऊन अधिक दक्ष राहून काम करण्याचा प्रयत्न करण्यात येईल. या लढाईत नागरिकांनी जास्तीत जास्त सहकार्य करून आवश्यक ती काळजी घेण्याची गरज असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.