नागपूर, ता.१७ : नागपूर महानगरपालिका प्रशासनातर्फे कडक निर्बंध लावल्यानंतरही रस्त्यावर अत्यावश्यक कामाशिवाय फिरणा-या नागरिकांची नागपूर पोलिस आणि मनपाच्या वैद्यकीय आरोग्य विभागातर्फे कोरोनाची एंटीजन चाचणी सुरु करण्यात आली आहे. या संयुक्त मोहिमेत आतापर्यंत महिन्याभरात ७९१४ नागरिकांची कोरोना चाचणी करण्यात आली आणि त्यापैकी २३८ कोरोना बाधित निघाले. कोरोना बाधितांना तत्काळ घरी जाऊन डॉक्टर्स सोबत संपर्क करण्याचा सल्ला देण्यात आला.
कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी राज्य शासनाच्या निर्देशानुसार मनपा तर्फे दिशा निर्देश जारी करण्यात आले आहे. विना कामाने फिरणा-या नागरिकांवर पोलिस कारवाई होत आहे. मनपाची आरोग्य यंत्रणा ११ ठिकाणी पोलिस सोबत नागरिकांची कोरोना चाचणी करीत आहे. राणाप्रतापनगर चौक, डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक, मानेवाडा चौक, खापरी नाका चौक, दिघोरी नाका चौक, मेयो रुग्णालय चौक, पारडी नाका चौक, ऑटोमोटिव्ह चौक, साई मंदिर चौक (जुनी कामठी), जुना काटोल नाका चौक आणि नवीन काटोल नाका चौक येथे चाचणी करण्यात आली. कोरोना चाचणीमुळे विना कारण फिरणा-या नागरिकांवर आळा बसला आहे. मनपा आरोग्य यंत्रणेची टीम मनपा आयुक्त श्री. राधाकृष्णन बी, अतिरिक्त आयुक्त श्री. राम जोशी, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. संजय चिलकर यांचा मार्गदर्शनात डॉ. शुभम मनगटे आणि चमू ही चाचणी करीत आहे. या कामात झोनल वैद्यकीय अधिकारी व सहाय्यक आयुक्त यांचे सहकार्य मिळत आहे.