नागपूर, ता. १७ : कोरोनाच्या संकटात प्रत्येक रुग्णाला योग्य उपचार मिळावे यासाठी अत्यावश्यक असलेले २० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर ‘बारामती ॲग्रो’कडून नागपूर महानगरपालिकेला भेट देण्यात आले आहेत. आमदार तथा बारामती ॲग्रोचे सीईओ रोहित पवार यांच्या पुढाकाराने नागपूर शहराला कोरोनाच्या या संकटात मदतीचा हात मिळाला आहे. सोमवारी (ता.१७) मनपा मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिका-यांनी २० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्याकडे सुपूर्द केले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते दुनेश्वर पेठे, ज्येष्ठ नगरसेविका आभा पांडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष अनिल अहिरकर, युथ विंग अध्यक्ष शैलेंद्र तिवारी, महेंद्र भांगे, प्रेम झाडे, माजी नगरसेवक अशोक काटले, अर्चना हर्षे, श्याम मंडपे, लक्ष्मी सावरकर, कुणाल राउत आदी उपस्थित होते.
कोरोनाच्या दुस-या लाटेमध्ये उद्भवलेली परिस्थिती सावरण्यासाठी आरोग्य विभागाची चमू अहोरात्र सेवा देत आहे. मनपा प्रशासनाद्वारे आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करण्याचा सर्वोतोपरी प्रयत्न सुरू आहे. अशामध्ये सेवाभावातून नागरिकांच्या जीवासाठी केली जाणारी मदत काम करण्याची अधिक प्रेरणा देते. नागपूरातील रुग्णांचा जीव वाचविण्यासाठी आतापर्यंत सेवाभावातून अनेकांनी साथ दिली. यामध्येच आता आमदार रोहित पवार यांच्या ‘बारामती ॲग्रो’कडून मिळालेली मदत आणखी एक भर आहे. मनपा प्रशासनाचे हात बळकट करण्यासाठी ही मोठी भेट ठरणार आहे. २० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरमुळे अनेक रुग्णांना दिलासा मिळणार आहे, अशा शब्दांमध्ये मनपा आयुक्त यांनी ‘बारामती ॲग्रो’ आणि सर्व पदाधिका-यांचे आभार मानले.