नागपूर, ता. १७ : लक्ष्मीनगर झोन अंतर्गत प्रभाग ३७मधील गडर लाईन संबंधी आवश्यक कार्य लवकरात लवकर पूर्ण करा, असे निर्देश स्थापत्य समिती सभापती राजेंद्र सोनकुसरे यांनी दिले आहे.
प्रभाग ३७ मधील गडर लाईन संबंधी समस्येबाबत स्थानिक नगरसेवक तथा शिक्षण समिती सभापती दिलीप दिवे यांच्या मनपा आमसभेतील प्रश्नावर महापौर दयाशंकर तिवारी यांच्याद्वारे तीन सदस्यीय समिती गठीत करण्यात आली होती. समितीचे अध्यक्ष तथा स्थापत्य व प्रकल्प विशेष समिती सभापती राजेंद्र सोनकुसरे यांनी सोमवारी (ता.१७) समितीची आढावा बैठक घेतली.
स्थापत्य समिती सभापती कक्षामध्ये झालेल्या बैठकीत समिती सभापती राजेंद्र सोनकुसरे यांच्यासह शिक्षण समिती सभापती दिलीप दिवे, मुख्य अभियंता मनोज तालेवार, कार्यकारी अभियंता श्री. गुरूबक्षाणी,उपअभियंता नितीन बोबडे, कनिष्ठ अभियंता श्री.सुरडकर उपस्थित होते.
बैठकीत लक्ष्मीनगर झोनचे कार्यकारी अभियंता श्री. गुरूबक्षाणी, उपअभियंता नितीन बोबडे, कनिष्ठ अभियंता श्री.सुरडकर यांनी कामाची प्रत्यक्ष पाहणी करून संपूर्ण कामाचे प्राकलन तयार करण्याचे निर्देश बैठकीत सभापतींनी दिले. याशिवाय संबंधित कंत्राटदाराला पत्र देणे तसेच टिप टॉप कॉन्व्हेंट ते त्रिशरण नगर पर्यंत रस्त्याची मनपाच्या हॉटमिक्स प्लाँटमधून दुरूस्ती करून कार्याची रक्कम संबंधित कंत्राटदाराच्या बिलामधून कपात करण्याचेही निर्देश समिती सभापती राजेंद्र सोनकुसरे यांनी दिले.