दहावीचा निकाल उद्या दिनांक १६ जूलै ला होणार जाहीर
हायलाइट्स
दहावीचा निकाल १६ जुलै रोजी
यंदा करोनामुळे दहावीची परीक्षा रद्द
अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे मिळणार गुण
महाराष्ट्र समाचार : महाराष्ट्रातील दहावीच्या बोर्ड परीक्षांच्या निकालाची प्रतीक्षा अखेर संपली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे सन २०२१ मध्ये अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे तयार करण्यात आलेला इयता १०वीचा ऑनलाईन निकाल शुक्रवारी दि.१६ जुलै,२०२१ रोजी दुपारी एक वाजता जाहीर होणार आहे. राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ही माहिती दिली.
यावर्षी प्रथमच करोना महामारी संसर्गामुळे दहावीची परीक्षा रद्द करण्यात आली होती. परिणामी विद्यार्थ्यांचे मूल्यमापन त्यांच्या वर्षभरातील तसेच आधीच्या वर्षाच्या कामगिरीच्या आधारे करण्यात आले. अकरावी प्रवेशांसाठी ऐच्छिक सीईटी घेतली जाणार आहे.
दहावीची लेखी परीक्षा २९ एप्रिल २०२१ ते २० मे २०२१ या कालावधीत आयोजित करण्यात आली होती. मात्र करोना महामारीच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर ही परीक्षा रद्द करण्यात आली. मंडळाच्या इतिहासात प्रथमच अशा पद्धतीने दहावीची संपूर्ण परीक्षाच रद्द करण्यात आली. दहावीच्या परीक्षेसाठी यंदा एकूण १६ लाख ५८ हजार ६२४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यापैकी ९ लाख ९ हजार ९३१ विद्यार्थी तर ७ लाख ४८ हजार ६९३ विद्यार्थिनी होत्या.
२८ मे २०२१ च्या शासन निर्णयानुसार मंडळाने परीक्षा रद्द केली. दहावीच्या विद्यार्थ्यांना त्यांचे नववीचे वार्षिक परीक्षेचे गुण तसेच दहावीचे अंतर्गत मूल्यमापनाचे गुण यावर आधारित मूल्यांकन करण्यात येणार आहे.
कुठे पाहाल निकाल?
http://result.mh-ssc.ac.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना निकाल पाहता येणार आहे.
याव्यतिरिक्त www.mahahsscsscboard.in या राज्य मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर निकाल जाहीर होणार आहे.