उद्योगांचे अर्थचक्र सुरू राहावे, उत्पादनांमध्ये अडथळे येऊ नये यासाठी शासन प्रयत्नशील – जिल्हाधिकारी संदीप कदम
• कामगारांचे लसीकरण करून घ्या
• कोविड प्रोटोकॉलचे पालन करा
• ऑक्सिजन निर्मितीवर भर द्यावा
भंडारा : संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील उद्योग क्षेत्र सुरू रहावे यासाठी शासनाचा पूर्ण प्रयत्न असून उद्योगांचे अर्थचक्र सुरू राहावे, उत्पादनांमध्ये अडथळे येऊ नये या दृष्टीने व्यवस्था निर्माण करण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न सुरू आहेत. उद्योग समूहाने कोविड प्रोटोकॉलचे पालन करत जिल्हा प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात आज उद्योग समूहाच्या प्रतिनिधींसोबत बैठक आयोजित करण्यात आली होती त्यावेळी ते बोलत होते.
निवासी उपजिल्हाधिकारी शिवराज पडोळे, सुनील रंभाड, सनफ्लॅगचे समीर पटेल, प्रफुल्ल मेश्राम, मानस ऍग्रो इंडस्ट्रीजचे दिनेश परमारे, जिल्हा उद्योग केंद्राचे एस. आर. तिवारी, कुमार जैस्वाल, हिंदुस्थान कंपोझिटचे विजय भालेराव, अशोक लेलँडचे अरविंद बोरडकर, डॉ. रचना मित्तल, व्ही. आर. परिदा, आयध निर्माणीचे अभिलाष देशमुख, कपडा मर्चंटचे सोनू वाधवाणी यावेळी उपस्थित होते.
कोव्हीडच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी ऑक्सिजन उत्पादन, साठा यांचे नियोजन तसेच उद्योगांतील कामगार- कर्मचारी यांचे मोठ्या प्रमाणावर लसीकरण, निर्बंध कडक करावे लागले तरी आर्थिक चक्र सुरू ठेवणे, उत्पादनावर परिणाम होऊ न देणे, कामगारांची कंपनीच्या परिसरातील तात्पुरती फिल्ड निवास व्यवस्था, कामाच्या वेळा, कोविड प्रादुर्भाव होऊ न देणारी व्यवस्था (बायो बबल) यावर या बैठकीत चर्चा करण्यात आली.
येणाऱ्या काळात कोव्हीडचे आव्हान अधिक वाढले तर ऑक्सिजनची मागणी दुसऱ्या लाटेपेक्षा देखील अधिक भासू शकते. त्यामुळे ऑक्सिजन निर्मितीबरोबरच ऑक्सिजनचा मोठ्या प्रमाणावर साठा करून ठेवणे, त्यासाठी टँक्स, सिलिंडरची आवश्यकता आहे. याबाबत उद्योग समूहाने नियोजन करावे असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले.
उद्योगांनी त्यांच्या कामगार व कर्मचाऱ्यांचे लसीकरण मोठ्या प्रमाणावर करून घ्यावे. छोट्या मोठ्या उद्योगांमध्ये कोव्हीडपासून प्रभावित न होणारी बायो बबल यंत्रणा निर्माण करून त्यामाध्यमातून आरोग्याचे नियम पाळून सुरक्षित उत्पादन सुरू ठेवता आले पाहिजे. काटेकोर निर्बंध लावावे लागले तर उत्पादनावर परिणाम होऊ नये म्हणून कामगारांच्या निवासासाठी कंपनीच्या परिसरात किंवा जवळपास फिल्ड निवास व्यवस्था उभारण्याच्यादृष्टिने नियोजन करावे, कामांच्या पाळ्या अशारीतीने निश्चित कराव्यात की, गर्दी होणार नाही व कुठल्याच सुविधेवर ताण येणार नाही हे पाहावे असेही जिल्हाधिकारी म्हणाले.
नव्या उत्परीवर्तीत विषाणूमुळे अधिक काळजी घ्यावी लागणार असून आणखी काही महिने तरी आपल्याला मास्क नियमित वापरणे, हात सातत्याने धुत राहणे, अंतर पाळणे व स्वच्छता ठेवणे याकडे काटेकोरपणे लक्ष द्यावे लागणार आहे असे ते म्हणाले. ज्या कामगार काम करतात तो परिसर व यंत्र सामुग्रीचे नियमित निर्जंतुकिकरण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. या बैठकीत उद्योग समूहाच्या प्रतिनिधींनी आपल्या अडचणी व समस्या मांडल्या. शासन स्तरावरील बाबी शासनाच्या निदर्शनास आणून दिल्या जातील व जिल्हा स्तरावरील प्रश्न प्राधान्याने सोडविल्या जातील असे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.