16 नळ पाणी पुरवठा योजनांना प्रशासकीय मान्यता
• 6 कोटी 05 हजार खर्च
• आठ योजना सोलरवर
• 763 गावात योजना प्रस्तावित
• 302 गावात कामे सुरू
भंडारा:- प्रत्येक गावासाठी पाणी पुरवठा योजना व प्रत्येक घरी नळ या उद्देशाने जल जीवन मिशन अंतर्गत भंडारा जिल्ह्यातील 6 कोटी 05 हजार रुपये किमतीच्या 16 योजनांना जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी प्रशासकीय मान्यता प्रदान केली.
जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन समितीची सभा आज जिल्हाधिकारी संदीप कदम यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली. या समितीने प्रस्तावित योजनेच्या कामांना सर्वानुमते मान्यता प्रदान केली. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विनय मून, उपवनसंरक्षक एस. एस. भलावी, उप मुख्य कार्यकारी अधिकारी संघमित्रा कोल्हे, कार्यकारी अभियंता पाणी पुरवठा विजय देशमुख, वरिष्ठ भु वैज्ञानिक शिवाजी पदमने, उप अभियंता यांत्रिकी नितीन पाटील, उप अभियंता तुमसर दिनेश देवगडे, सहायक भु वैज्ञानिक व्ही. एम. मंत्री, उप अभियंता मजिप्र डी. यु. तुरकर व अधिकारी उपस्थित होते.
जल जीवन मिशन अंतर्गत सुधारणात्मक नळ जोडणी व नळ पाणी पुरवठा योजनेच्या 15 लक्षावरील कामांना प्रशासकीय मान्यता प्रदान करण्याचे अधिकार शासनाने जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन समितीस दिले आहेत त्याअनुषंगाने मुख्य अभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण नागपूर यांनी नवीन योजना व सुधारणात्मक योजना अशा 6 कोटी 05 हजार रुपये किमतीच्या एकूण 16 योजनांना सादरीकरणाद्वारे मान्यता दिली होती. या योजनांना आज समितीने प्रशासकीय मान्यता प्रदान केली आहे. यात आठ योजना सोलरवर चालणाऱ्या आहेत.
जिल्हाधिकारी यांनी मान्यता दिलेल्या योजना खालीलप्रमाणे आहेत. भंडारा तालुक्यातील सालेहेटी 24 लाख 98 हजार, सीतेपर 23 लाख 98 हजार, लाखनी तालुक्यातील गोंदी 24 लाख 21 हजार, सानगाव 15 लाख 65 हजार, सायगाव 16 लाख 83 हजार, पवनी तालुक्यातील चन्नेवाडा 27 लाख 30 हजार, खैरी 26 लाख 88 हजार, सुरेबोडी 20 लाख 89 हजार (उपरोक्त सर्व योजना सोलरवरील आहेत) कुर्झा 24 लाख 98, लाखांदूर तालुक्यातील आसोला 66 लाख 09 हजार, विरली बु. 61 लाख 70 हजार, मोहाडी तालुक्यातील खडकी 87 लाख 66 हजार, पांजरा बोथली 41 लाख 76 हजार, विहिरगाव 46 लाख 12 हजार व तुमसर तालुक्यातील मेहेगाव 60 लाख 55 हजार आणि पांजरा योजना 30 लाख 47 हजार किमतीच्या योजनांना आज मान्यता देण्यात आली आहे.
प्रत्येक घरी नळ जोडणी जिल्ह्यातील 763 गावात प्रस्तावित असून 302 गावात योजनेची कामे सुरू आहेत. जिल्ह्यात 52 टक्के घरी नळ जोडणी देण्यात आली असून उर्वरित नळ तातडीने देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. भूजल सर्व्हेक्षण आणि विकास यंत्रणेच्या सुवर्ण महोत्सवी वर्धापन दिनानिमित्त तयार करण्यात आलेल्या जनजागृती पोस्टरचे या बैठकीत प्रकाशन करण्यात आले.