NBP NEWS 24,
1 AUGUST 2021.
नागपूर, ता. १ : मजूर, कामगार, कष्टकरी, गरिबांच्या न्यायासाठी अण्णाभाऊ साठे यांनी आयुष्य खर्ची घातले. शिक्षित नसूनही त्यांनी दर्जेदार साहित्य या देशालाच नव्हे तर जगाला दिले. अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याने जगाला क्रांतीची प्रेरणा दिली, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री तथा राज्य विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले.
साहित्यभूषण लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त रविवारी (ता.१) विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दीक्षाभूमी चौक नागपूर येथील साहित्यभूषण लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक स्थळी त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

याप्रसंगी महापौर दयाशंकर तिवारी, शहर भाजपाध्यक्ष आ. प्रवीण दटके, अनुसूचित जाती आयोगाचे सदस्य सुभाष पारधी, भाजपा प्रदेश सचिव तथा नगरसेवक ऍड. धर्मपाल मेश्राम, माजी आमदार डॉ. मिलींद माने, माजी सत्तापक्ष नेते संदीप जाधव, अनुसूचित जाती मोर्चाचे शहर प्रभारी सतीश शिरसवान, अनुसूचित जाती मोर्चाचे नागपूर शहर अध्यक्ष राजेश हातीबेड, नागेश सहारे, प्रमोद तभाने, लखन येरावार, उषा पॅलट, रवींद्र डोंगरे, योगेश पाचपोर, शंकरराव वानखेडे, सागर जाधव, शशिकला बावणे, नम्रता माकोडे, वच्छला मेश्राम आदींसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले, अण्णाभाऊ साठे यांनी स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्यानंतरच्या काळात राजकीय प्रश्नांविषयी महाराष्ट्रात त्यांनी मोठी जागृती केली. त्यात संयुक्त महाराष्ट्र चळवळ, गोवा मुक्ती संग्राम या चळवळींमध्ये त्यांनी शाहिरीतून दिलेले योगदान महत्त्वाचे आहे. त्यांच्या शाहीरीने तळागाळातील कष्टकरी, मजूर वर्गाच्या प्रश्नांना वाचा फोडली. अण्णाभाऊ साठे यांचे राज्यासह देशावर अनेक उपकार असल्याची भावनाही त्यांनी व्यक्त केली.