नागपूर, ता. ,२० : विविध कारणांमुळे रखडलेल्या कामांच्या मार्गातील अडसर दूर करा आणि तातडीने कामे पूर्ण करा, असे निर्देश स्थापत्य समिती सभापती राजेंद्र सोनकुसरे यांनी दिले.
नागपूर महानगरपालिकेच्या नेहरू नगर झोन आणि गांधीबाग झोनमधील रखडलेल्या कामांसंदर्भात त्यांनी शुक्रवारी (ता.२०) आढावा बैठक घेतली. यावेळी ते बोलत होते. नेहरू नगर झोनमधील बैठकीला झोन सभापती स्नेहल बिहारे, सहायक आयुक्त हरीश राऊत आणि गांधीबाग झोनच्या बैठकीत सभापती श्रद्धा पाठक, सहायक आयुक्त अशोक पाटील यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
रखडलेले काम तात्काळ लवकरात लवकर पूर्ण सुरू करण्याचे निर्देश यावेळी सभापतींनी दिले. नगरसेवकांच्या कामाला प्राधान्य देण्यात यावे व तात्काळ पूर्ण करण्यात यावे. दोन्ही झोन अंतर्गत रस्त्याची दुरुस्ती व खड्डे बुजवणे, गरिबांना रोजगार मिळावा यादृष्टीने बाजारासाठी जागा उपलब्ध करून देण्याचा दिशेने प्रयत्न करावे, असेही निर्देश त्यांनी दिले.
आज कोव्हिडमुळे बरेच रोजगार संपुष्टात आले आहेत. त्यामुळे त्या दिशेने शहरात काम करणे गरजेचे आहे. नागपुर शहरात अनेक मोबाईल टॉवर आहेत. मात्र त्यापासून होणारे उत्पन्न थांबले आहे. याबाबतीत तात्काळ तोडगा काढण्यास त्यांनी सांगितले. इतर कामासंदर्भातही दोनही झोनचे सहायक आयुक्त यांना निर्देश देण्यात आले.