बजेरियात छत्रपती शिवाजी महाराजांच्या म्यूरलचे अनावरण
नागपूर समाचार : छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आद्य दैवत आहेत. देशाचा जाणता राजा म्हणून शिवाजी महाराजांनी सदैव जनतेचे हितच केंद्रस्थानी ठेवून कार्य केले. समाजातील शेवटच्या घटकातील व्यक्तीला नेतृत्वाची संधी देउन त्यांच्या खांद्यावर स्वराज्याची पताका उंच उंच नेली. समाजातील शोषित वर्गाला नेतृत्वकर्ता बनविण्याचे कार्य छत्रपती शिवाजी महाराजांनी केले. प्रत्येक पिढीसाठी प्रेरणास्त्रोत असणा-या शिवाजी महाराजांचे म्यूरल ही अभिमानास्पद आणि गर्वाची बाब आहे. हे म्यूरल स्थानिक युवक आणि जनतेला सदैव चांगले कार्य करण्यासाठी प्रेरणास्त्रोत ठरणार आहे, असा विश्वास महापौर दयाशंकर तिवारी यांनी व्यक्त केला.
नागपूर महानगरपालिकेच्या महापौर निधीतून बजेरिया येथे साकारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या १० फूट उंच म्युरलचे अनावरण बुधवारी (ता. ६) महापौर दयाशंकर तिवारी यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी आमदार गिरीश व्यास, नगरसेवक ॲड. संजय बालपांडे, नगरसेविका सरला नायक, विद्या कन्हेरे, सामाजिक कार्यकर्ते किशोर पलांदुरकर, अनिल मानापूरे, विलास त्रिवेदी, विनायक डेहनकर, सुबोध आचार्य, ब्रजभूषण शुक्ला, अजय गौर, रमाकांत गुप्ता, उमेश वाजूरकर, अनूप गोमासे, अमोल कोल्हे, ऋषी साहू, प्रशांत गौर, प्रवीण श्रीवास, नयन साहू, विक्की प्रजापती, प्रह्लाद नायक आदी उपस्थित होते.
महापौर दयाशंकर तिवारी यांनी शिवाजी महाराजांचे नेतृत्व आणि व्यवस्थापन कौशल्याची उदाहरणे देऊन त्यांचा जाज्वल्य इतिहास सांगितला. ते पुढे म्हणाले, पितृमोक्ष अमावस्या म्हणजे आपल्या पूर्वजांचे स्मरण करण्याचा दिवस आहे. म्हणूनच १० फूट उंच असलेल्या स्मारकाच्या माध्यमातून आजच्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांना आदरांजली अर्पण करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नेतृत्वात सर्व धर्म, जातींना सोबत घेउन स्वराज्याची निर्मिती झाली. छत्रपती शिवाजी महाराजांनी समाजातील सर्वात शेवटच्या स्तरातील व्यक्तीला सोबत घेउन त्यांना नेतृत्व प्रदान केले.
आपल्या या मावळ्यांच्या नेतृत्वात त्यांनी किल्ल्यांवर विजय मिळविले. रायबा नावाच्या सैनिकाने जिंकलेल्या किल्ल्याला महाराजांनी रायगड हे नाव दिले. कुठल्याही प्रकारचा जातीभेद न करता आपल्या सोबत्यांना सन्मान देत समाजातील अंतिम वर्गाला सोबत घेउन राष्ट्रनिर्माणाची संकल्पना छत्रपती शिवाजी महाराजांनी साकार केली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील एकेक पैलू आज व्यवस्थापनाच्या अभ्यासक्रमात शिकविले जातात ही त्यांच्या दूरदृष्टी आणि कुशल नेतृत्वाची साक्ष आहे, असेही ते म्हणाले. बजेरीया येथे साकारलेल्या म्यूरलचे व्यवस्थापन आणि देखरेख परिसरातील युवकांकडून केली जाणार आहे, असेही महापौरांनी सांगितले.
यावेळी उपस्थित बालकांनी शिवाजी महाराजांचा जयघोष केला. साहसी खेळांचे प्रात्यक्षिक यावेळी लहान मुलांद्वारे करण्यात आले. तसेच आत्मसंरक्षण करण्याविषयी नागरिकांना विविध प्रकारचे प्रात्यक्षिक करून दाखविले.
तत्पूर्वी महापौर दयाशंकर तिवारी आणि आमदार गिरीश व्यास यांनी प्रतिमेचे पूजन करीत अनावरण केले. आमदार गिरीश व्यास यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाची महती सांगत त्यांचे नावच आजच्या पिढीसाठी प्रेरणा असल्याचे ते म्हणाले.
छत्रपती संभाजी महाराज क्रीडा संकुल, न्यू सुभेदार लेआउटचे संचालक तुषार सातव यांच्या नेतृत्वात ४४ मुलांनी आखाड्याचे विविध प्रात्याक्षिक सादर केले. दानपट्टा, लाठी, तलवारबाजी, भालेबाजी, अग्नीबाण अशा विविध चित्तथरारक प्रात्याक्षिकांनी मुलांनी प्रेक्षकांची मने जिंकली. या क्रीडा पथकाच्या कौतुकास्पद प्रात्यक्षिकाचा गौरव म्हणून आमदार गिरीश व्यास यांच्याद्वारे पाच हजार व रवीशंकर गुप्ता यांच्याद्वारे २१०० रुपये रोख पुरस्कार देण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन ब्रजभूषण शुक्ला यांनी केले.