नागपूर, ता. २२ : टँकरमुक्त नागपूर शहर ही संकल्पना पूर्णत्वास नेण्याच्या दृष्टीने नागपूर शहरात अमृत योजने अंतर्गत जलकुंभांची निर्मिती होत आहे. पाणी पुरवठ्याची समस्या असलेल्या दक्षिण नागपूर भागामध्ये निर्माण होत असलेल्या जलकुंभांमुळे येत्या काळात या संपूर्ण भागात २४ तास पाणी पुरवठा होऊन नागरिकांना दिलासा मिळेल, असा विश्वास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.
नागपूर महानगरपालिकेच्या माध्यमातून अमृत योजनेंतर्गत शहरातील सक्करदरा २ बिडीपेठ आशीर्वाद नगर येथील इंदिरा गांधी सभागृह मैदान, उमरेड रोडवरील मोठा ताजबाग परिसर, वंजारीनगर २ सक्करदरा जलकुंभाजवळ बांधण्यात येणा-या जलकुंभाचा संयुक्त भूमिपूजन सोहळा शुक्रवारी (ता.२२) इंदिरा गांधी सभागृह मैदान, आशीर्वादनगर, बिडीपेठ येथे पार पडला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते तिनही जलकुंभाच्या कार्याचे भूमिपूजन झाले. यावेळी ते बोलत होते.
मंचावर खासदार डॉ.विकास महात्मे, महापौर दयाशंकर तिवारी, आमदार मोहन मते, स्थायी समिती सभापती प्रकाश भोयर, सत्तापक्ष नेता अविनाश ठाकरे, स्थापत्य समिती सभापती राजेंद्र सोनकुसरे, महिला व बालकल्याण समिती सभापती दिव्या धुरडे, नेहरूनगर झोन सभापती स्नेहल बिहारे, हनुमान नगर झोन सभापती कल्पना कुंभलकर, माजी स्थायी समिती सभापती ज्येष्ठ नगरसेवक विजय (पिंटू) झलके, नगरसेवक नागेश सहारे, नगरसेविका रिता मुळे, नगरसेवक भगवान मेंढे, नगरसेविका मंगला खेकरे, स्वाती आखतकर, भारती बुंडे, रुपाली ठाकूर, माधुरी ठाकरे, दक्षिण नागपूरचे अध्यक्ष देवेन दस्तुरे, परशू ठाकूर, रमेश चोपडे, नीता ठाकरे, ज्योती देवघरे, ताजबाग ट्रस्टचे अध्यक्ष प्यारे खान, सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी विभागाचे अधीक्षक अभियंता मनोज तालेवार, उपअभियंता राजेश दुफारे आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना ना. नितीन गडकरी म्हणाले, शहर विकासाच्या कार्यात नागरिकांचा सहभाग हा अत्यावश्यक आहे. नागपूर शहरात पाण्याची समस्या नाही यात केवळ पुरवठ्यामध्ये अडथळे असल्याने जास्तीत जास्त जलकुंभ निर्माण करून त्या माध्यमातून नागरिकांना योग्यरीत्या मुबलक पाणी मिळू शकेल यासाठी प्रयरत्नरत आहोत, असे सांगतानाच सदर तिनही जलकुंभांच्या निर्मितीसाठी वेळोवेळी पाठपुरावा केल्याबद्दल महापौर दयाशंकर तिवारी, आमदार मोहन मते, माजी स्थायी समिती सभापती विजय (पिंटू) झलके यांचे त्यांनी अभिनंदन केले.
आजपर्यंत नागपूर शहरात सर्वत्र विकास कामांसाठी ८० हजार कोटी निधी मिळाला आहे. यामधून शहरात वीज, पाणी, शिक्षण यासह सर्व क्षेत्रात काम करण्यात येत आहे व काही प्रस्तावित सुद्धा आहेत. कोरोनामुळे आज गोरगरीब व सर्वांसाठी आरोग्य सुविधेची गरज आहे. यासाठी ताजबाग ट्रस्ट च्या माध्यमातून ४०० बेडचे ताजुद्दीन बाबा यांच्या नावाने हॉस्पिटल तयार करण्यासाठी पुढाकार घेतला जावा अशी सूचना ना. गडकरी यांनी प्यारे खान यांना केली. या कार्यात आपण पूर्ण ताकदीने उभा असल्याचा विश्वासही त्यांनी दिला. पाणी पुरवठ्यासह नागपूर शहरात पाईप लाईनद्वारे स्वयंपाकाच्या गॅसचा पुरवठा करण्याचा मानसही यावेळी ना. गडकरी यांनी व्यक्त केला.
महापौर दयाशंकर तिवारी यांनी शहरातील पिण्याच्या पाण्याची समस्या सोडविण्यासाठी अमृत योजने अंतर्गत निर्माण होत असलेल्या जलकुंभाच्या कार्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आभार मानले व या कार्याचे संपूर्ण श्रेय त्यांचे असल्याचे सांगितले. जलकुंभाच्या निर्मितीसाठी प्रस्तावित जागांच्या अडचणी, त्यासाठी आवश्यक केंद्र अथवा राज्याची परवानगी मिळवून देण्याचे मौलिक कार्य केवळ ना. गडकरी यांच्यामुळे शक्य झाले. दक्षिण नागपूर पाठोपाठ शहरातील विविध भागांमध्ये सुमारे १५ जलकुंभाच्या कामांचे भूमिपूजन लवकरच होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
दक्षिण नागपूरचे आमदार मोहन मते यांनी सांगितले की, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या टँकर मुक्त नागपूर या संकल्पनेतून अमृत योजने अंतर्गत शहरात ४३ टाक्या बांधण्याचे प्रस्तावित आहेत. यापैकी दक्षिण नागपुरात एकूण ६ टाक्यांची निर्मिती होणार आहे. यापैकी एकावेळी तीन टाक्यांचे होणारे भूमिपूजन हे दक्षिण नागपूरच्या सुकर भविष्याची नांदी आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकाराने येत्या काळात दक्षिण नागपुरात २४ तास पाणी पुरवठा होईल यात शंका नसल्याचेही ते म्हणाले.
प्रास्ताविकात माजी स्थायी समिती सभापती ज्येष्ठ नगरसेवक विजय (पिंटू) झलके यांनी अमृत योजने अंतर्गत शहरात निर्माण होत असलेल्या जलकुंभाच्या संदर्भात माहिती दिली. नागपूर शहरात अमृत योजने अंतर्गत २७८ कोटी निधी मधून एकूण ४३ टाक्या तयार करणे प्रस्तावित असून यापैकी २७ टाक्या मनपाद्वारे निर्माण करण्यात येत आहेत. शेषनगर येथे डबल डेकर टाकी प्रस्तावित असून ही देशातील पहिली डबल डेकर टाकी ठरणार आहे, असेही ते म्हणाले.
कार्यक्रमाचे संचालन अभिजित मुळे यांनी केले. आभार नेहरूनगर झोन सभापती स्नेहल बिहारे यांनी मानले.