पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांच्याहस्ते प्रमाणपत्रांचे वाटप
नागपूर समाचार : कोविडमुळे अनाथ झालेल्या बालकांच्या पाठीशी राज्याचे आघाडी शासन पालक म्हणून उभे आहे.या बालकांच्या संगोपनात पाच लाखाची मुदत ठेव निश्चितच महत्त्वाची ठरणार आहे, तथापि,आपल्या दुःखापुढे ही मदत काहीच नाही. मात्र फुल ना फुलाची पाकळी म्हणून शासनाने दिलेल्या या मदतीचा योग्य वापर करा, आपले जीवन घडवा, असे आवाहन आणि अपेक्षा राज्याचे ऊर्जा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.नितीन राऊत यांनी एका भावनिक कार्यक्रमात केले.
कोविड-19 मुळे अनाथ झालेल्या बालकांना 5 लक्ष रुपयाचे मुदत ठेव प्रमाणपत्र व अनाथ प्रमाणपत्र वितरणाचा कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बचत भवन सभागृहात आयोजित करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी विमला आर., जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी अपर्णा कोल्हे,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, बाल कल्याण समितीचे अध्यक्ष राजीव थोरात, बाल न्याय मंडळाचे सदस्य श्री. जोगी, सुरेखा बोरकुटे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी श्री. साळवे, एकात्मिक बाल विकास अधिकारी चिचाणे व जिल्हा बाल संरक्षण अधिकारी मुश्ताक पठाण आदी यावेळी उपस्थित होते.
ज्या बालकांचे वय १८ पेक्षा कमी आहेत, अशी नागपूर जिल्ह्यात ७१ बालके अनाथ आहेत. त्यापैकी ६१ बालकांच्या बँकेत खाते उघडण्यात आले आहेत. ५२ लाभार्थ्यांची रक्कम सेंट्रल बँक इंडीयामध्ये जमा झालेली आहे. अनाथ झालेल्यांना वयाची २१ वर्षे पूर्ण झाल्यानंतर मुदत ठेवची रक्कम मिळणार आहे. जीवनात आलेल्या प्रसंगाला सामोरे जावे लागते. या संकटाच्या काळात या अनाथांच्या पाठिशी आपण उभे राहिले पाहिजे, अशी भूमिका महाविकास आघाडी सरकारने घेतली.
राज्याच्या महिला व बालविकास विभागातर्फे कोविड काळात अनाथ बालकांना मदत करण्याचा निर्णय झाला. पाच लाख रुपयांची मदत पुरेशी आहे, असा आमचा दावा अजिबात नाही. आई-वडीलांची भरपाई कुणीही करू शकत नाही. परंतु फुल ना फुलाची पाकळी या न्यायाने महाविकास आघाडी सरकारने ही मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. ही मुदत ठेव निश्चितपणे आपल्या भावी आयुष्यात कामी येणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
कोविड -19 महामारीमुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना शासनाकडून पाच लक्ष रुपयाची मदत मुदत ठेव प्रमाणपत्राच्या स्वरुपात दिल्या जात आहे. त्यातून त्या अनाथ बालकांचे सुरळीत संगोपन व शिक्षणाची जबाबदारी पार पाडल्या जाणार आहे. दोन्ही पालक गमावलेल्या जिल्ह्यातील 52 अनाथ बालकांना शासनाकडून 5 लक्ष रुपयाची मुदत ठेव मंजूर करण्यात आली असून आज पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या हस्ते मुदतठेव प्रमाणपत्र संबंधितांना वितरीत करण्यात आले. त्या सोबतच अनाथ प्रमाणपत्राचे वितरण मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. प्रारंभी दीप प्रज्वलीत करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
गेल्या दीड-दोन वर्षांपासून आपण सर्वजण कोरोनाचा सामना करीत आहोत. कोरोनाची पहिली लाट आली तेव्हा आपल्या कुणालाच काही कल्पना नव्हती. उपचार काय करायचे, याची पुरेशी माहिती डॉक्टरांना नव्हती. गेल्या एप्रिल महिन्यात दुसरी लाट आली. या लाटेचे रौद्र रुप आपण अनुभवले. दवाखान्यांतील खाटा कमी पडत होत्या,ऑक्सीजनचे सिलेंडर नव्हते, औषधींचा पुरवठा नियमित नव्हता. अशा सर्व विपरित परिस्थितीचा सामना केला. अक्षरशः हतबल झालो होतो. पालकमंत्री म्हणून माझ्याकडे नागपूर जिल्ह्याची जबाबदारी होती. माझ्या जिल्ह्यातील रुग्णांना उपचार मिळाले पाहिजे, ही माझी पहिली प्राथमिकता होती, असे त्यांनी सांगितले.
या आणिबाणीच्या काळात मेडीकल व मेयोतील खाटांची संख्या दुप्पट केली. ऑक्सीजन सिलेंडरचे प्लांट लावले. माझे हे प्रयत्न पुरेसे होते असे नाही. परंतु तुम्हाला आज सांगतो, मला त्या काळात झोप येत नव्हती. अनेकांना माझ्या जवळच्या लोकांना सुद्धा रुग्णालयात खाटा उपलब्ध होऊ शकल्या नाहीत. ही वस्तुस्थिती आहे. सध्या रुग्णांची संख्या कमी झाली आहे. परंतु हे संकट टळलेले नाही. तिसरी लाट येऊ शकेल, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. नागपुरातील आरोग्य सेवा आता बरीच सक्षम झाली आहे. खाटांची संख्या वाढली आहे, ऑक्सीजनचे प्लांट पुरेसे झालेले आहेत. परंतु आपण सर्वांनी कोरोनासाठी असलेले निर्बंध पाळलेच पाहिजे. पुढे दिवाळीचा सण आहे. या काळात आपण गर्दीवर नियंत्रण ठेवले पाहिजे, दुकानांमध्ये जाताना मास्क लावणे, सॅनिटायझरचा वापर करणे आवश्यक आहे.
पहिल्या व दुसऱ्या लाटेत आपण प्रत्येकाने आप्त, नातेवाईक, मित्र गमावले आहे. आज येथे एकत्रित झालेल्या अनाथ बालकांचे दुःख मी शब्दात मांडू शकत नाही. त्यांच्यावर कोसळलेले संकट हे कुणावरही येऊ नये. आई-वडीलांशिवाय आयुष्य काढणे हे किती कठीण हे तेच लोक सांगू शकतात. तुम्ही कितीही श्रीमंत असा परंतु आई-वडीलांच्या मायेची सर कोणत्याही संपत्तीला नाही. आपण हा ठेवा दुर्दैवाने गमावला आहे. याची मला पूर्ण जाणीव आहे, असे ते म्हणाले. भविष्यकाळात ज्या काही समस्या भेडसावणार आहेत. त्या सोडविण्यासाठी शासन सदैव पाठिशी आहे,असे त्यांनी सांगितले.
कोविड -19 मुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांची सद्यस्थितीबाबत जिल्ह्यात कोविडमुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांची संख्या 71 आहे. त्यापैकी 69 बालकांचे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी आणि संबंधित लाभार्थी यांचे संयुक्त बँक खाते उघडण्यात आले आहे. दोन्ही पालक गमावलेल्या 58 बालकांची केंद्र शासनाच्या पी. एम. केअर पोर्टल या संकेतस्थळावर नोंदणी झाली असून 48 बालकांना बाल कल्याण समितीची मान्यता देण्यात आली आहे.कोविडमुळे दोन्ही पालक गमावलेल्या अनाथ बालकांच्या पालकांच्या संपत्तीबाबत ती कायम राहावी म्हणून जिल्हा निबंधक आणि जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांनी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्याकडून मार्गदर्शन मिळवून अनाथ बालकांकडून कोणत्याही शाळेने शाळा शुल्क घेऊ नये यासाठी शिक्षणाधिकाऱ्यांनी सर्व शासकीय तसेच खासगी शाळांना सूचना देण्यात आल्या आहेत, असे जिल्हाधिकारी विमला आर., यांनी सांगितले.
प्रास्ताविक जिल्हा माहिला व बालविकास अधिकारी अपर्णा कोल्हे यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन कविता इखार व साधना हटवार यांनी केले तर उपस्थितांचे आभार बाल कल्याण अधिकारी मुश्ताक पठाण यांनी मानले. या कार्यक्रमास कोविड 19 मध्ये पालक गमावलेले बालक, त्यांचे नातेवाईक अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.