३० नोव्हेंबर पर्यंत आरोग्य चमू घरोघरी जाऊन करणार लसीकरण
नागपूर समाचार : केंद्र व राज्य शासनाच्या आरोग्य विभागाच्या निर्देशानुसार कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी आणि संभाव्य तिसर्या लाटेचा प्रादूर्भाव टाळण्याबरोबरच कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला गती देण्यासाठी नागपूर महानगरपालिकेतर्फे शहरात ३० नोव्हेंबर पर्यंत हर घर दस्तक अभियांनातंर्गत लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेअंतर्गत मनपा आरोग्य विभागाची चमू घरोघरी जाऊन पात्र नागरिकांचे लसीकरण करणार आहे. मोहिमेत शहरातील सर्व नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी केले आहे.
या अभियानांतर्गत पहिला डोस घेतलेल्या नागरिकांना दुसर्या डोस देण्यात येणार असून यासाठी आरोग्य विभाग, महसूल विभाग, पोलीस विभागासह इतर विभाग, स्वयंसेवी, सामाजिक संस्थांची मदत घेण्यात येणार आहे. लसीकरणासाठी आरोग्य विभागाची चमू शहरातील प्रत्येक नागरिकांच्या घरी जाऊन लसीकरण करणार आहे. या मोहिमेचे सूक्ष्म नियोजन करण्यात आले आहे.
या अभियानांतर्गत आरोग्य विभागाचे कर्मचारी प्रामुख्याने आशा वर्कर प्रत्येक नागरिकाच्या घरी भेट देणार आहेत. याद्वारे कुटुंबातील लसीकरण व्हायचे आहे काय, याची माहिती घेणार आहे. याशिवाय लसीकरणाचा टक्का कमी असलेल्या भागात शिबिरेदेखील आयोजित करण्यात येणार आहेत. शहरातील झोपडपट्टी व अस्वच्छ भागात घरोघरी भेट देऊन कोरोना संशयित वा अन्य आजारी व्यक्तींची स्थिती जाणून घेण्यात येणार असल्याची माहिती मनपा अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी दिली. तसेच मोहिमेला गती देण्यासाठी आशा वर्कर, स्वयंसेवी, सामाजिक संस्थांनी नागरिकांना लसीकरणाचे महत्व समजावून सांगून पहिला डोस घेतलेल्यांना दुसरा डोस तर एकही डोस न घेतलेल्या नागरिकांना लसीकरणासाठी प्रोत्साहित करावे. हर घर दस्तक अभियानात शहरातील जास्तीत जास्त नागरीकांनी सहभागी होऊन लसीकरणासाठी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी केले आहे.
आतापर्यंत एकूण २६,६९,९४२ नागरिकांचे लसीकरण
नागपूर शहरात आतापर्यंत एकूण २६,६९,९४२ नागरिकांचे लसीकरण झाले. यात १७,०१,६३४ नागरिकांनी पहिला व ९,६८,३०८ नागरिकांनी दोनही डोस घेतले आहेत.