मोहिमेचा लाभ घ्या ; आजच आपले नाव मतदार यादीत नोंदवा
नागपुर समाचार : नागपूर महानगरपालिकेची आगामी सार्वत्रिक निवडणूक लक्षात घेता पात्र नवमतदारांनी मतदार यादीत नाव नोंदणी करणे आवश्यक आहे. मतदार नोंदणीपासून कोणीही वंचित राहू नये यासाठी भारत निवडणूक आयोगाच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत २७ नोव्हेंबर व २८ नोव्हेंबर रोजी मतदार नोंदणी व मतदार यादीतील दुरुस्ती, तपासणी संदर्भात विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. भारतीय संविधानाने दिलेला मतदानाचा अधिकार प्रत्येक १८ वर्ष पूर्ण झालेल्या नागरिकाला बजावता यावा यासाठी मतदार नोंदणी होणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे १ जानेवारी २०२२ रोजी वयाची १८ वर्ष पूर्ण करणा-या सर्व व्यक्तींनी आपले नाव मतदार यादीमध्ये नोंदविले जावे यासाठी या विशेष मोहिमेचा लाभ घ्यावा, असे आवाहन मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी केले आहे.
भारत निवडणूक आयोगाद्वारे १ ते ३० नोव्हेंबर दरम्यान विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहिर करण्यात आलेला आहे. या कार्यक्रमांतर्गत नवमतदार नोंदणी आणि नोंदणी झालेल्यांच्या नाव, पत्ता यासह अन्य दुरुस्ती करण्यात येत आहे. या कार्यक्रमासाठी आता अवघा आठवडाभर वेळ शिल्लक असून जास्तीत जास्त नवमतदारांची नाव नोंदणी व्हावी यासाठी विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. यापूर्वी १३ व १४ नोव्हेंबर रोजी नागपूर शहरात विशेष मोहिम राबविण्यात आलेली होती त्यानंतर आता २७ व २८ नोव्हेंबर रोजी विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. जास्तीत जास्त नवमतदार आणि मतदार यादीमध्ये दुरूस्ती करू इश्चिणा-या व्यक्तींनी या मोहिमेचा लाभ घ्यावा, असे आवाहन मनपा आयुक्तांनी केले आहे.
निवडणूक हा लोकशाहीचा उत्सव आहे. या उत्सवामध्ये सहभागी होण्याची पहिली पायरी मतदार नोंदणी आहे. १८ वर्ष पूर्ण केलेल्या प्रत्येक व्यक्तीने मतदार यादीत नाव नोंदवून लोकशाही व्यवस्थेत सहभागी व्हावे. मतदार यादीमध्ये नाव नोंदणी आणि दुरूस्तीची प्रक्रिया अधिक सोपी करण्यात आलेली आहे. ही प्रक्रिया घरबसल्या मोबाईल, संगणकावरूनही करता येईल किंवा प्रत्यक्षात मतदार सुविधा केंद्रामध्ये जाउनही प्रक्रिया पूर्ण करता येणे शक्य आहे.
ऑनलाईनरित्या www.nvsp.in हे संकेतस्थळ किंवा https://voterportal.eci.gov.in/ हे पोर्टल किंवा Voter Helpline App (VHA) या मोबाईल ॲपवरून अगदी काही क्षणांमध्ये प्रक्रिया पूर्ण करता येते. या विशेष मोहिमेंतर्गत दिव्यांग, तृतीयपंथी आदी सर्वांचीच नोंदणी करण्यात येत आहे. त्यामुळे प्रत्येकाने आता आपले राष्ट्रीय कर्तव्य पार पाडण्यासाठी लगेच आपले नाव मतदार यादीत नोंदवावे, असेही आवाहन मनपातर्फे करण्यात येत आहे.
नाव नोंदणी करताना आवश्यक कागदपत्रे
मतदार म्हणून नाव नोंदणी करू इच्छिणाऱ्या नागरिकाने अर्ज क्रमांक ६ भरणे आवश्यक आहे.
१. अर्जदार भारताचा नागरिक असावा
२. स्वतःचे छायाचित्र (पासपोर्ट साईज फोटो)
३. इतर कोणत्याही मतदार यादीत नाव नाही याविषयीचे प्रतिज्ञापत्र, जे अर्ज क्रमांक ६ मध्ये अंतर्भूत असते.
४. वयाचा दाखला
५. निवासाचा पुरावा