मनपा परिसरात प्रायोगिक तत्वावर पर्यावरणपूरक सायकल स्टॅन्ड मनपा आयुक्तांनी केली पाहणी
नागपूर समाचार : पर्यावरणपूरक वाहन व्यवस्थेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि नागिरकांना सायकल चालविण्यास प्रोत्साहित करण्याच्या हेतून नागपूर महानगरपालिकेतर्फे मनपा मुख्यालय परिसरात प्रायोगिक तत्वावर पर्यावरणपूरक सायकल स्टॅन्ड सुरु करण्यात आले आहे. शुक्रवारी (ता. २६) मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी या सायकल स्टॅन्डची पाहणी केली.
यावेळी अतिरिक्त आयुक्त राम जोशी, अतिरिक्त आयुक्त दीपककुमार मीना, वाहतूक अभियंता श्रीकांत देशपांडे, उपअभियंता अजय डहाके, स्मार्ट सिटीच्या डॉ. प्रणिता उमरेडकर, प्रकल्प कार्यकारी डॉ. पराग अरमल आदी उपस्थित होते.
सध्या कुठेही मोटारसायकल आणि कारसाठी पार्कींगची व्यवस्था करण्यात आलेली असते. मात्र सायकल पार्क करण्यासाठी कोणतीही व्यवस्था नसते. त्यामुळे सायकलच्या सुरक्षेच्या दृष्टीने कुणीही सायकलचा वापर करीत नाही. परंतु ग्रीन मोबिलिटी आणि नॉन मोटराइज्ड ट्रान्सपोर्टेशनला चालना देण्यासाठी नागपूर महानगरपालिकेतर्फे प्रायोगिक तत्वावर पर्यावरणपूरक सायकल स्टॅन्ड सुरु करण्यात आले आहे.
सायकलचा वापर वाढल्यास प्रदूषण कमी होईल, नागरिकांचे आरोग्य चांगले राहिल, सायकल सुरक्षित राहिल, इंधनाच्या बचतीसोबतच पैशाची सुद्धा बचत होईल, असेही ते म्हणाले. शहरातील इतर सरकारी कार्यालयांनी सुद्धा अशा प्रकारचे सायकल स्टॅन्ड सुरु करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
या सायकल स्टॅन्डवर सायकल चालवा, आरोग्य टिकवा, सायकल चालवा पर्यावरण वाचवा, “पृथ्वी को प्रदूषणमुक्त बनाये”, सायकल चलाये अशा प्रकारची पर्यावरणपूरक संदेश देणारे फलक सुद्धा लावण्यात आले आहेत.