हाइलाइट्स
- नागपूरकरांना खासदार नितीन गडकरी यांची खास सांस्कृतिक मेजवानी.
- ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ मध्यवर्ती संकल्पना
- प्रसिद्ध अभिनेते संजय दत्त यांच्या हस्ते उद्घाटन.
- स्थानिक, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील कलाकाराचा सहभाग.
नागपूर समाचार : विदर्भाचे सांस्कृतिक वैभव ठरलेल्या खासदार सांस्कृतिक महोत्सवाचे 17 ते 26 डिसेंबर दरम्यान आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवाचे यंदाचे हे चौथे वर्ष आहे. हनुमाननगरातील क्रीडा चौक येथील ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या पटांगणावर होणा-या या महोत्सवाची मध्यवर्ती संकल्पना ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ ही आहे, अशी माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.
केंद्रीय मंत्री मा. श्री. नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून 2017 साली खासदार सांस्कृतिक महोत्सवाला प्रारंभ झाला होता. नागपूर-विदर्भातील प्रतिभावंत कलाकारांना मोठा मंच मिळावा, त्यांची प्रतिभा देशभरात पोहोचावी, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या कलाकारांकडून शिकता यावे, आदान-प्रदान व्हावी, हा मा. श्री. नितीन गडकरी यांचा खासदार सांस्कृतिक महोत्सव सुरू करण्यामागे उद्देश होता.
2017 ते 2019 असे तीन वर्ष महोत्सवाचे शानदार आयोजन करण्यात आले. दरवर्षी महोत्सवाचे स्वरूप विस्तारत गेले. जागतिक कीर्तीचे आध्यात्मिक गुरू व आर्ट ऑफ लिव्हींगचे प्रणेते श्री श्री रविशंकर, प्रसिद्ध अभिनेते सलमान खान, अनिल कपूर, जॅकी श्राफ, अभिनेत्री व नृत्यांगना हेमामालिनी, कवी कुमार विश्वास, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे वादक राकेश चौरसिया, शिवमणी, संगीतकार जोडी जतिन-ललित, गायक सुरेश वाडकर, नंदेश उमप, प्रसेनजीत कोसंबी यांच्यासारख्या यांच्यासह हजारो कलावंतांनी महोत्सवात आपली कला सादर केली आहे. 2020 मध्ये कोविड महामारीमुळे महोत्सवाच्या आयोजनात खंड पडला होता. याहीवर्षी महोत्सव होईल की नाही अशी शंका होती. निवडणुक आचारसंहितेचा अडथळा पार करत अखेर खासदार सांस्कृतिक महोत्सवाला येत्या, 17 डिसेंबर पासून प्रारंभ होत आहे.
अभिनेते संजय दत्त यांची उपस्थिती : खासदार सांस्कृतिक महोत्सवाचे उद्घाटन शुक्रवार, 17 डिसेंबर रोजी ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या पटांगणात होणार आहे. बॉलिवुडचे प्रसिद्ध अभिनेते संजय दत्त यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
होणार देशभक्तीचा जागर : यंदा देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करणार असून त्याच संकल्पनेवर महोत्सवाची आखणी करण्यात आलेली आहे. उद्घाटनाच्या दिवशी ‘चक दे इंडिया’ या ऑस्कर पुरस्कार विजेत्या गीताचे शीर्षक असलेल्या कार्यक्रत फिल्मफेअर अवॉर्ड विजेते पार्श्वगायक सुखविंदर सिंह यांची ‘लाईव्ह इन कॉन्सर्ट’ होणार आहे. यात ते देशभक्तीपर गीते सादर करतील. ‘डान्स ऑन व्हील्स’ फेम डॉ. सय्यद पाशा यांनी खासदार महोत्सवासाठी खास ‘संस्कृतिका उत्सव’ या कार्यक्रमाची निर्मिती केली असून यात दिव्यांग कलाकार भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवेल. ‘माय कंट्री – माय इंडिया’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून गायक व संगीतकार शंकर महादेवन काश्मीर ते कन्याकुमारी आणि गुजराथ ते उत्तर-पूर्व पर्यंतच्या संस्कृतीची सांगड घालणार आहेत. प्रसिद्ध कुमार विश्वास व त्यांचे सहकवी ‘काव्यमैफल’ मध्ये देशावर आधारित कविता सादर करणार आहेत.
हास्य, काव्याची मेजवानी : सुफीयाना गीताचे बादशहा कैलाश खेर यांची सुफी गाणी ‘कैलाश खेर – कैलासा’ सादर करणार असून काणेबुवा प्रतिष्ठानचा ‘व्होकल क्लासिकल अँड लाईट क्लासिकल’ कार्यक्रम तसेच, ‘नॉर्थ – साऊथ’ हा वाद्य जुगलबंदीचा कार्यक्रम होणार आहे. यात पं. राकेश चौरसिया, शशांक सुब्रमणियम, ओजर आडिया, मंजुषा पाटील, रघुनंदन पणशीकर, सौरभ नाईक, नागेश आडगावकर व संजय उपाध्याय यांचा सहभाग राहील. नागपूरचे महानाट्य ‘आम्रपाली’ भगवान गौतम बुद्धांच्या विचारांनी प्रेरित असून नारीशक्तीचा संदेश देईल. विनोदाचा महासंग्राम ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ नागपूरकरांना हसवेल. महोत्सवाचा समारोप 26 डिसेंबर रोजी प्रसिद्ध अभिनेत्री व नृत्यांगना हेमामालिनी यांच्या नृत्यनाटिका ‘राधारासबिहारी’ ने होणार आहे. खासदार सांस्कृतिक महोत्सवात सादर होणा-या जागतिक दर्जाच्या कलेचा आस्वाद नागपूरकरांनी घ्यावा, असे आवाहन खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, प्रा. अनिल सोले व इतर पदाधिका-यांनी केले आहे.
घरबसल्या मिळवा पासेस : नागपूरकरांना या सांस्कृतिक महोत्सवाचा आस्वाद घेता यावा, या उद्देशाने यंदा ऑनलाईन माध्यमातून घरबसल्या पासेस मिळवता येणार आहेत. त्याकरीता नागरिकांनी 9158880522 या टोल फ्री क्रमांकावर मिस कॉल द्यायचा असून एक डिजिटल लिंक तयार होईल. ही लिंक क्लीक केल्यानंतर कार्यक्रमाची पास घरबसल्या आपल्या मोबाईलवर प्राप्त करता येईल. कोविड नियमांचे होणार काटेकोर पालन खासदार सांस्कृतिक महोत्सवात दरवर्षी होणारी गर्दी बघता यंदा कोविडच्या पार्श्वभूमीवर सरकारने त्यासंदर्भात घालून दिलेल्या सर्व अटी व नियमांचे पालक केले जाणार आहे. आपत्ती व्यवस्थापन समितीची त्यासाठी मदत घेतली जात असून आयोजनस्थळी दररोज 8 ते 10 हजार मास्क वितरीत केले जाणार आहे. दोन खुर्च्यांमध्ये 5 ते 6 फूटांचे अंतर राखले जाणार असून पटांगणाच्या सहा प्रवेशद्वारांवर सॅनिटायझरची व्यवस्था राहणार आहे.
खासदार सांस्कृतिक महोत्सवाचे वेळापत्रक
शुक्रवार, 17 डिसेंबर : उद्घाटन व सुखविंदर सिंग यांची ‘लाईव्ह इन कॉन्सर्ट – चक दे इंडिया’
शनिवार, 18 डिसेंबर : ‘कैलाश खेर अँड कैलासा’ बँड लाईव्ह परफॉर्मन्स
रविवार, 19 डिसेंबर : ‘कविसंमेलन’ सहभाग – कुमार विश्वास, विमल त्यागी, शिखा पचौरी, विनीत कुमार आणि शंभू चौधरी
सोमवार, 20 डिसेंबर : काणेबुवा प्रतिष्ठानचा ‘व्होकल क्लासिकल अँड लाईट क्लासिकल’ कार्यक्रम
मंगळवार, 21 डिसेंबर : ‘नॉर्थ – साऊथ’ जुगलबंदी
बुधवार, 22 डिसेंबर : निराली प्रॉडक्शनचे ‘आम्रपाली’ महानाट्य
गुरुवार, 23 डिसेंबर : ‘संस्कृतिका उत्सव’ डॉ. सय्यद पाशा आणि चमूचा ‘डान्स ऑन व्हिल्स’
शुक्रवार, 24 डिसेंबर : ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’
शनिवार, 25 डिसेंबर : शंकर महादेवन यांचा ‘माय इंडिया… माय म्युझिक’ कार्यक्रम
रविवार, 26 डिसेंबर : ‘राधारासबिहारी’ हेमामालिनी यांची नृत्यनाटिका