महापौर दयाशंकर तिवारी यांची संकल्पना : तीन विविध विषयांवर स्पर्धा
नागपूर समाचार : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवर्षनिमित्त नागपूर शहरात अभिनव स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. महापौर दयाशंकर तिवारी यांच्या संकल्पनेतून नागपूर शहरातील ७५ भिंती स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी रंगात रंगविण्याची स्पर्धा लवकरच मनपातर्फे आयोजित करण्यात येणार आहे.
या स्पर्धेच्या आयोजनाबाबत मंगळवारी (ता.१४) मनपा मुख्यालयातील महापौर सभागृहामध्ये बैठक घेण्यात आली. बैठकीत महापौर दयाशंकर तिवारी, अतिरिक्त आयुक्त दीपककुमार मीना, उपायुक्त मिलींद मेश्राम, शिक्षणाधिकारी प्रीति मिश्रीकोटकर, सहायक शिक्षणाधिकारी राजेंद्र सुके, नागपूर जिल्हा कला अध्यापक संघाचे अध्यक्ष नरेंद्र बारई, कोषाध्यक्ष शेखर वानस्कर, सॉफ्ट टच वॉल पुट्टी अँड पेंटचे व्यवस्थापकीय संचालक स्वप्नील मोहता आदी उपस्थित होते.
भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्ष पूर्ण झाले. स्वातंत्र्याचा हा अमृत महोत्सव नागपूर शहरामध्ये विविध संकल्पनांसह साजरा होत आहे. महापौर दयाशंकर तिवारी यांच्या अभिनव संकल्पनांमधून भारतीय स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष हे नागपूरकरांसाठी महत्वाचा संदेश देणारे ठरावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत. नागपूर शहरात असलेल्या विविध शासकीय कार्यालये, शासकीय रुग्णालय, मनपाची आरोग्य केंद्र, महाविद्यालये, धार्मिक स्थळे, विमानतळ यासोबतच अन्य संस्थांच्या इमारती अशा विविध ठिकाणच्या ७५ भिंती ह्या संदेश देणा-या ठराव्यात यासाठी महापौरांच्या संकल्पनेतून स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या अनुषंगाने ‘भारताचा इतिहास’, ‘उद्याचा नागपूर’ आणि ‘नागरिक कर्तव्य’ या तीन थीमवर स्पर्धा असणार आहे. स्पर्धेमध्ये नागपूर शहरातील कलावंत, शासकीय चित्रकला महाविद्यालयाचे विद्यार्थी, शिक्षक आदी सर्वांचा सहभाग असणार आहे. स्पर्धेसाठी मनपातर्फे आवश्यक रंगाचा पुरवठा करण्यात येणार आहे. मनपाला रंगासाठी सॉफ्ट टच वॉल पुट्टी अँड पेंट यांचे सहकार्य मिळाले आहे.
शहरातील भिंतीद्वारे नागरिकांना विविध संदेश प्राप्त व्हावेत, इतिहासाची माहिती व्हावी, आपल्या जबाबदा-यांची जाणीव होउन त्याची जनजागृती व्हावी हा या स्पर्धेचा उद्देश आहे. स्पर्धेच्या आयोजनासंबंधी एक समिती गठीत करण्यात यावी. समितीद्वारे सर्व विभागांनी समन्वयाने कार्य करून स्पर्धेच्या आयोजनाबाबत अडचणींचे निराकरण करता यावे यासाठी या समितीमध्ये स्थावर विभाग, जाहिरात विभाग आणि शिक्षण विभागाच्या कर्मचा-यांचा समावेश करण्याचे निर्देश बैठकीत महापौरांनी दिले. स्पर्धेला मूर्तरूप देण्यासाठी शहरातील विविध कलावंत तसेच चित्रकला महाविद्यालयाच्या प्रतिनिधींसोबतही यापुढे बैठक घेउन चर्चा करण्यात येणार असल्याचे महापौरांनी यावेळी सांगितले.