संदीप सिंग व ज्वाला गुट्टाच्या उपस्थितीत कॉफी टेबलबुकचे विमोचन आज शनिवार रोजी 18 डिसेंबरला
नागपूर समाचार : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या खासदार क्रीडा महोत्सवाचे आयोजन पुढील महिन्यात शहरातील विविध मैदानांवर होणार आहे. या महोत्सवाच्या तारखांची घोषणा व कॉफी टेबल बुकचे विमोचन नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्या, शनिवारी दुपारी साडे बारा वाजता रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात होणार असल्याची माहिती, खासदार क्रीडा महोत्सव समितीचे मुख्य संयोजक माजी महापौर संदीप जोशी यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी भारतीय हॉकी संघाचे माजी कर्णधार व हरियाणाचे क्रीडा मंत्री संदीप सिंग आणि अर्जून पुरस्कारविजेती आंतरराष्ट्रीय महिला बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टा विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
व्यासपीठावर महापौर दयाशंंकर तिवारी, माजी मंत्री आमदार चंद्रशेखर बावनकुळे, खासदार डॉ. विकास महात्मे, माजी आमदार सुलेखा कुंभारे, माजी खासदार अजय संचेती, आमदार प्रवीण दटके, कृष्णा खोपडे, गिरिश व्यास, मोहन मते, विकास कुंभारे, नागो गाणार उपस्थित राहणार आहेत. उपराजधानीतील युवा खेळाडूंना व्यासपीठ मिळवून देण्याच्या उद्देशाने तीन वर्षांपूर्वी सुरू झालेला खासदार क्रीडा महोत्सव गतवर्षी कोरोनामुळे होऊ शकला नव्हता. यंदाच्या चौथ्या क्रीडा महोत्सवात ३० ते ३५ क्रीडा प्रकारांचा समावेश राहणार असल्याचे जोशी यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला नगरसेवक नागेश सहारे, मनपा क्रीडा अधिकारी पीयूष आंबुलक व आशीष मुकिम उपस्थित होते.