खासदार सांस्कृतिक महोत्सवाचा सातवा दिवस
नागपूर समाचार, 23 डिसेंबर : वेदपुराण, साहित्य, कला, संस्कृती, शौर्यगाथा यांचा देदिप्यमान इतिहास असलेल्या भारत देशावर अनेक आक्रमणे झाली. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. स्वातंत्र्यानंतर विश्वसत्तेच्या वाटेवर वेगाने निघालेल्या भारत देशाचा या अभिमानास्पद कामगिरीचा इतिहास दिव्यांग कलाकारांनी ”संस्कृती उत्सवा”मध्ये सादर करून नागपूरकरांना अचंबित केले.
व्हिलचेअरवरील कलाकारांनी आकर्षक नृत्य सादर केले, कर्णबधिर कलाकारांनी गीतांच्या ठेक्यावर ताल धरला आणि मतिमंद कलाकारांनी त्यांना उत्तम साथ देत रसिकांना तोंडात बोटे घालायला भाग पाडले.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या खासदार सांस्कृतिक महोत्सवाच्या सातव्या दिवशी म्हणजे गुरुवारी ईश्वर देशमुख महाविद्यालयाच्या पटांगणावर डॉ. सय्यद पाशा यांच्या ‘मिऱ्याकल ऑन व्हील्स’ च्या चमूने ”संस्कृती उत्सव’ सादर केला. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त खास तयार करण्यात आलेल्या या कार्यक्रमात दिव्यांग कलाकारांनी ‘कल्चर ऑन व्हील्स’ चे प्रदर्शन घडवले.
डॉ. सय्यद पाशा यांनी यावेळी रसिकांशी संवाद साधला. ते म्हणाले, अनेक आक्रमणे झाली पण आपल्या संस्कृती व परंपरेला कोणीच धक्का पोहोचवू शकले नाही. अशा या थोर संस्कृतीचे दर्शन आम्ही खास स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त सादर केले आहे. यात नागपूर च्या 24 कलाकारांचाही समावेश असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाची सुरुवात खास खासदार सांस्कृतिक महोत्सवासाठी तयार करण्यात आलेल्या अमृत महोत्सव है ये भारत की गौरव गाथा या अँथमने करण्यात आली. त्यानंतर दिव्यांग कलाकारांनी एकदंताय वक्रतुंडाय ही गणपती वंदना प्रस्तुत केली. तीन टप्प्यात विभागलेल्या या कार्यक्रमातील पहिल्या टप्प्यात भारतीय कला, संस्कृती, साहित्याचे दर्शन घडवण्यात आले. दुस-या टप्प्यात देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणा-या झाशीची राणी लक्ष्मीबाई, भगतसिंग, राष्ट्रपिता महात्मा गांधी, जालियनवाला बाग हत्याकांडातील स्वातंत्र्यविरांना आदरांजली अर्पण करण्यात आली. तिस-या टप्प्यात आत्मनिर्भर भारत, डिजिटल इंडियासह स्वातंत्र्यानंतरच्या 75 वर्षात देशाने केलेल्या प्रगतीचा आलेख प्रस्तुत करण्यात आला. डॉ. सय्यद पाशा यांनी हा कार्यक्रम देशाला, पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना समर्पित केला.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी कार्यक्रमाला उपस्थिती लावली. सुरुवातीला कांचनताई गडकरी व इतर मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने सातव्या दिवसाच्या कार्यक्रमाची सुरुवात झाली. याप्रसंगी पोलिस आयुक्त अमितेश कुमार, नीरीचे संचालक अतुल वैद्य, संगीत सुरमणी पं. प्रभाकर धाकडे, उद्योगपती जयसिंग चौहान, डॉ. विनोद आसुदानी, आरबीआय चे राजेश आसुदानी, जेष्ठ समाजसेवक डॉ. संजय बजाज, जेष्ठ समाजसेवक नामदेव बर्गर, नृल हसंजी, विजय मुनिश्वर, दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राचे संचालक डॉ. दीपक खिरवडकर यांचे स्वागत करण्यात आले.
खासदार सांस्कृतिक महोत्सव आयोजन समितीचे अध्यक्ष प्रा. अनिल सोले, उपाध्यक्ष मधूप पांडे, गौरीशंकर पाराशर, अशोक मानकर, दिलीप जाधव, सचिव जयप्रकाश गुप्ता, कोषाध्यक्ष प्रा. राजेश बागडी, सदस्य बाळासाहेब कुलकर्णी, हाजी अब्दुल कादिर संजय गुलकरी, संदीप गवई, चेतन कायरकर, आशिष वांदिले, भोलानाथ सहारे, रेणुका देशकर यांचे कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहकार्य लाभत आहे. सूत्रसंचालन बाळासाहेब कुळकर्णी यांनी केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदीही अवतरले : दिव्यांग कलाकरांनी सादर केलेल्या ‘सांस्कृतिका उत्सव’ पंतप्रधान नरेंद्र मोदी अवतरले. अमृत महोत्सवानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या भाषणाचा अतिशय कल्पक रितीने कॉमेंट्री सारखा वापर करत डॉ. सय्यद पाशा यांनी या कार्यक्रमाची आखणी केली होती. अतिशय सूत्रबद्ध अशा या कार्यक्रमाला रसिकांनी चांगलीच दाद दिली.