अखिल भारतीय कवी संमेलनात चढला देश भक्तीचा : देशातील नामवंत कवींना नागपूरकरांनी दिली भरभरून दाद
नागपूर समाचार, ता. २६ : ‘देश दीपक पर जले ऐसा पतंगा चाहिए एकता, सद्भावना की धार गंगा चाहिए, तन पे लाखों रंग से खेलिए होली मगर मन में केवल तीन रंगो का तिरंगा चाहिए…’
देशभक्ती जागविणाऱ्या या ओळींसह कमल आग्नेय यांनी अखिल भारतीय कवी संमेलनाची रंगतदार सुरूवात केली. पुढे एकाहून एक सरस कवींच्या रचनांनी गांधीबाग उद्यान परिसर पूर्णत:च्या देशभक्तीच्या रंगात रंगला. अखिल भारतीय कवी संमेलनात सहभागी देशातील नामवंत कवींच्या अप्रतिम रचनांना नागपूरकरांनीही भरभरून दाद दिली.
भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव, भारतरत्न माजी पंतप्रधान स्व. अटल बिहारी वाजपेयी यांची जयंती आणि गांधीबाग उद्यानाच्या नूतनीकरणाचा वर्धापन दिन या त्रिवेणी संगमाच्या अनुषंगाने नागपूर महानगरपालिकेच्यावतीने शनिवारी (ता.२५) सेंट्रल एव्हेन्यू येथील गांधीबाग उद्यानात अखिल भारतीय कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.
कवी संमेलनाच्या उद्धाटन प्रसंगी संमेलनाचे संयोजक महापौर दयाशंकर तिवारी, आमदार प्रवीण दटके, उपमहापौर मनीषा धावडे, गांधीबाग झोन सभापती श्रध्दा पाठक, माजी आमदार गिरीश व्यास, ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल, संदीप जाधव, विजय (पिंटू) झलके, ज्येष्ठ नगरसेविका आभा पांडे, नगरसेवक अॅड. संजय बालपांडे, नगरसेविका सरला नायक, विद्या कन्हेरे आदी उपस्थित होते. कार्यक्रमात कोव्हिड संदर्भातील नियमांचे पालन करून आवश्यक ती सर्व खबरदारी घेण्यात आली.
कवी संमेलनात मुरैना येथील तेजनारायण शर्मा (हास्यरस), प्रयागराज येथील अखिलेश द्विवेदी (हास्यरस), धार येथील संदीप शर्मा (हास्य व्यंग), आगरा येथील भूमिका भूमी (गीत गजल), लखनऊ येथील कमल आग्नेय ‘ओज’, नोएडा येथील अमित शर्मा (वीररस), नागपूरचे दयाशंकर तिवारी ‘मौन’, महेश तिवारी या नामवंत कवींची उपस्थिती उल्लेखनीय ठरली.
प्रारंभी कवी महेश तिवारी यांनी अटल बिहारी वाजपेयी यांच्यावरील कविता त्यांच्याच शैलीत सादर करून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. भारतरत्न अटल बिहारी वाजयपेयी यांना कवितेतून दिलेल्या श्रद्धांजलीला उपस्थितांनी टाळ्यांतून वंदन केले. भूमिका यांनी ‘पदवंदना करू ’मै वाघेश्वरी भवानी’ सरस्वती वंदन सादरीकरण करून कवी संमेलनाची रितसर सुरुवात केली.
कोव्हिड संदर्भात महाराष्ट्र राज्य शासन आणि नागपूर महानगरपालिकतर्फे जारी करण्यात आलेल्या नवीन नियमावलीनुसार कार्यक्रमाचे नियमानुसार निर्धारित वेळेतच समापन करण्यात आले.
चवथ्यांदा अखिल भारतीय कवी संमेलनात सहभागी झालेले देशातील दिग्गज कवी तेजनारायण शर्मा यांच्या कविता ऐकण्यासाठी रसीकांमध्ये असलेली उत्सूकता वाखणण्याजोगी दिसून आली.
‘सड़क रास्ते जाम कराकर,
जलवा अपने नाम कराकर
सभी मसीहा लौट चुके है
शहर में कत्ले आम कराकर।’
माईकचा ताबा घेताच तेजनारायण शर्मा यांनी ही रचना सादर केली आणि उपस्थित रसीकांनी टाळ्यांच्या गजरात त्यांना दाद दिली.
कवी संमेलनात सहभागी एकमेव कवयित्री आगरा येथील भूमिका भूमी यांनी आपल्या शैलीत अनेक सुंदर रचनांचे सादरीकरण केले.
‘आंसू साथ नहीं देंगे ना खुलकर वो रो पाएंगे
कमी किसी के अंतस में विश्वास नही वो पाएंगे,
औरों का आविष्कार दिखाकर ऊपर चढ़ने वाले लोग
ऊंचे तो हो सकते है, आकाश नही हो पाएंगे’
श्रृंगार आणि प्रेमरस च्या कवयित्रीने सादर केलेल्या या कवितेवर रसीकांकडूनही चांगलाच प्रतिसाद मिळाला.
पुढे मंच संचालनाची जबाबदारी सांभाळणारे हास्य व्यंग कवी संदीप शर्मा यांनी आपल्या अनोख्या शैली सुरूवातीला रसीकांना चांगलेच हसविले. यानंतर मात्र त्यांनी ‘भगवा आतंकी नहीं हो सकता’ यावर आपली रोखठोक कविता सादर करताच परिसरात टाळ्यांसह जयघोषही झाले.
‘एक धर्म जो पूजे बंदर
भालू, कछुए, मछली को,
एक धर्म जो जगह दे रहा सबको असली नकली
एक धर्म जो तुलसी पूजे
नदियों को त्राता माने,
एक धर्म जो नंदी पूजे
गायों को माता माने
अरे त्याग का रंग राष्ट्र कलंकी नही हो सकता
कुछ भी हो मगर
भगवा आतंकी नही हो सकता’
संदीप शर्मा यांनी या कवितेसह पुन्हा एकदा देशभक्तीचे वातावरण निर्माण केले. पुढे अमित शर्मा यांनी त्यात भर घालण्याचे काम केले.
‘युवा देश का जब जब रण में अपनी ताकत तोलेगा।
चप्पा चप्पा इस भारत का वन्दे मातरम् बोलेगा।।’
या रचनेसह अमित शर्मा हे सादर होताच प्रेक्षकांमधून वंदे मातरम् चे जयघोष झाले.
माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजयपेयी यांच्या जयंतीनिमित्त कमल आग्नेय ‘ओज’ यांनी त्यांना कवितेतून काव्यांजली अर्पण केली.
‘मोदी जी के बाद शाह, योगी भी मिलेंगे पर
अटल का दूसरा दुवारा नही आएगा’
या कवितेसह त्यांनी दोन ओळीत अटल बिहारी वाजपेयी यांच्या जीवनाची महती पटवून दिली.
कार्यक्रमात सुरूवातीला कवी संमेलनाचे संयोजक महापौर दयाशंकर तिवारी यांनी संमेलनाच्या आयोजनाची पार्श्वभूमी विषद केली. सर्व सहभागी नामवंत कवींचे त्यांनी आपल्या ओजस्वी शैलीतून परिचय दिला यावेळीही उपस्थितांमधून भरघोष टाळ्यांचा प्रतिसाद मिळाला.
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त नागपूर शहरात सुरू असलेल्या विविध उपक्रमांची यावेळी महापौरांनी सविस्तर माहिती दिली. स्वातंत्र्याच्या ७५ वर्षपूर्तीनिमित्ताने शहरात ७५ वंदे मातरम् हेल्थपोस्ट तयार करण्यात येत असून हे हेल्थपोस्ट शहिद जवानांना समर्पित करण्यात येत आहेत.
याशिवाय वंदे मातरम् उद्यानही शहरात साकारण्यात येत आहे. एकूण नागपूर शहरात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त देशभक्ती जागविणारे विविध कार्यक्रम आणि उपक्रम राबविण्यात येत असून त्याबद्दल महापौरांनी माहिती दिली.