प्रशासन सतर्क… मंगळवारपासून जमावबंदी लागू , २८ डिसेंबरपासून अत्यावश्यक सेवा सोडून सर्व दुकाने रात्री ९ नंतर बंद
नागपूर समाचार : ओमायक्रॉनसह वाढत्या कोविड संक्रमणामुळे नागपुरात पुन्हा एकदा निर्बंध घालण्यात आले आहेत. येत्या २८ तारखेपासून प्रशासनाने रात्री ९ वाजेनंतर अत्यावश्यक सेवा सोडून सर्व दुकाने बंद ठेवण्याचा आदेश जारी केला आहे. रात्री ९ ते सकाळी ६ वाजेपर्यंत कडक जमाावबंदी लागू राहील.जिल्हाधिकारी विमला आर. व मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी शनिवारी यासंदर्भातील आदेश जारी केले आहे. यापूर्वी कोविडचा आढावा घेण्यासाठी उच्चस्तरीय बैठक घेण्यात आली.
या बैठकीत राज्य सरकारच्या जमावबंदी आदेशाच्या पार्श्वभूमीवर नागपुरात रात्री ९ ते सकाळी ६ वाजेपर्यंत जमावबंदी लागू करण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला. शनिवारी जिल्ह्यात कोविडचे २४ रुग्ण आढळून आल्याने चिंता व्यक्त करण्यात आली. तिसरी लाट येण्याची शक्यता लक्षात घेता सर्व यंत्रणांनी सज्ज राहण्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.नवीन नियमानुसार आता दुकाने रात्री ९ व शॉपिंग मॉल रात्री ९ वाजेपर्यंतच सुरू राहतील. चित्रपटगृहे व हॉटेल्स ही १२ वाजेपर्यंत सुरू राहतील. खेळांच्या स्पर्धा होतील, परंतु त्यात प्रेक्षकांना उपस्थित राहता येणार नाही.
सामाजिक, सांस्कृतिक, मनोरंजन, राजकीय, धार्मिक कार्यक्रम, संमेलन रात्री ९ वाजेपर्यंतच होऊ शकतील. लग्न समारंभसुद्धा रात्री ९ वाजेपर्यंतच संपवावे लागतील. ते सुद्धा बंद सभागृहात असेल तर जास्तीत जास्त १०० लोक आणि मोकळ्या जागेत असेल तर जास्तीत जास्त २५० लाेक उपस्थित राहू शकतील. शाळा-महाविद्यालयासंदर्भात सरकारच्या मागच्या आदेशांना कायम ठेवण्यात आले आहे. प्रशासनाने आदेश जारी करीत नागरिकांना सहकार्य करण्याची तसेच मास्कशिवाय घराबाहेर न पडण्याची विनंती केली आहे.