विदर्भाला अवकाळी पावसाचा तडाखा, वीज कोसळून दोघांचा मृत्यू
विदर्भ समाचार : विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, अमरावती यवतमाळ, वर्धा जिल्ह्यात अनेक ठिकाणी गारपीटीसह पाऊस बरसला. भंडारा जिल्ह्यात वीज कोसळून एक मुलगा तर, अमरावती जिल्ह्यात एक शेतकरी ठार झाला आहे. हवामान खात्याने विदर्भात २८ व २९ तारखेला ऑरेंज अलर्ट दिला होता. त्यानुसार नागपूर, भंडारा, गोंदिया, अमरावती यवतमाळ, वर्धा जिल्ह्यातील काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस बरसला असून काही ठिकाणी वीज पडून लोक दगावले आहेत. आधीच दाटलेल्या धुक्यामुळे पिकांवर परिणाम होताना त्यात पावसाची भर पडली असून गारपीटीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
या संकटाने शेतकऱ्यांच्या चिंतेत आणखी भर पडली आहे. नागपूर शहरासह जिल्ह्यातील अनेक भागात पावसाने हजेरी लावली आहे. नागपूरमध्ये काळेकुट्ट ढग दाटले असून हलक्या पावसाला सुरुवात झाली आहे. तर, नरखेड तालुक्यातील काही भागात सकाळपासूनच अधून मधून पडत असलेल्या अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे शेतीतील पिकांचे मोठं नुकसान झाले आहे.
भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यात शहरासह ग्रामीण भागातही गारांसह पाऊस बरसला. मोहाडी तालुक्यातील लोहारा, गायमुख, सोरणा, जांब व कांद्री परिसरांतही गारांसह पाऊस बरसला. मोहाडी तालुक्यातील नवेगाव धुसाळा शिवारात वीज कोसळून बारा वर्षीय मुलगा ठार झाला आहे. नयन परमेश्वर पुंडे असे मृत बालकाचे नाव आहे. मंगळवारी दुपारी ३:४५ ची ही घटना असून तो आजोबासोबत शेतशिवारात म्हशी चराईसाठी गेला होता. दरम्यान, वीजगर्जनेसह पावसाला सुरुवात झाली. अचानक वीज कोसळल्याने नयनचा मृत्यू झाला. तसेच शेतात तणसीच्या ढिगाजवळ बांधलेल्या बैलजोडीपैकी एक बैल ठार झाला.
या पावसामुळे रब्बी पिकांसह टोमॅटो, मिरची, कोबी व भाजीपाल्याचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे. गोंदिया जिल्ह्यातही मंगळवारी सायंकाळच्या सुमारास गारांसह पावसाने हजेरी लावली आहे.अमरावती शहरात हलका पाऊस पडला असून चिखलदरा येथे आज सकाळपासून धुक्याचे वातावरण आहे. तर, जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसासह गारपीट झाली असून धामणगाव रेल्वे तालुक्यातील तळेगाव दशासर येथे दुपारी ४ वाजताच्या सुमारास वीज पडून गजानन बापूराव मेंढे (४२) या कास्तकाराचा मृत्यू झाला.