- Breaking News, नागपुर समाचार, मनपा

नागपूर समाचार : शैक्षणिक संस्थांच्या सहकार्याने होणार १५ ते १८ वयोगटातील मुलांचे लसीकरण

अतिरिक्त आयुक्तांची शाळांच्या प्रतिनिधींसोबत सकारात्मक चर्चा

नागपूर समाचार, ता. २९ : केंद्र शासनाच्या निर्देशानुसार नागपूर महानगरपालिका हद्दीत ३ जानेवारीपासून १५ ते १८ वर्ष वयोगटातील मुलांना कोरोना प्रतिबंधात्मक लस देण्यात येणार आहे. या वयोगटात इयत्ता दहावी ते बारावीच्या विद्यार्थ्यांचा समावेश होतो. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या लसीकरणासाठी शहरातील सर्व शासकीय, खासगी शाळा, कनिष्ठ महाविद्यालये आणि कोचिंग क्लासचे सहकार्य घेण्यात येणार असल्याची माहिती, मनपाचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी दिली.

बुधवारी (ता. २९) मनपाच्या प्रशासकीय इमारतीतील कोरोना वॉर रूममध्ये मनपाचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी १५ ते १८ वयोगटातील विद्यार्थ्यांच्या लसीकरणाच्या नियोजनाबाबत शहरातील सर्व खासगी शाळा, कनिष्ठ महाविद्यालये आणि कोचिंग क्लासेसच्या प्रतिनिधींसोबत चर्चा केली. चर्चेदरम्यान सर्व प्रतिनिधींनी विद्यार्थ्यांच्या लसीकरणासाठी सकारात्मक प्रतिसाद दिला. यावेळी अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांच्यासह मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. संजय चिलकर, मनपाच्या शिक्षणाधिकारी प्रीति मिश्रीकोटकर, लसीकरण समन्वयक डॉ. गोवर्धन नवखरे तसेच शहरातील सर्व खासगी शाळा, कनिष्ठ महाविद्यालये आणि कोचिंग इन्स्टिट्यूटचे प्रतिनिधी उपस्थित होते.

यावेळी अतिरिक्त आयुक्त राम जोशी म्हणाले, केंद्र शासनाच्या निर्देशानुसार ३ जानेवारी २०२१ पासून मनपा हद्दीत १५ ते १८ वयोगटातील मुलांना कोव्हिड प्रतिबंधात्मक लसीचा पहिला डोस देण्यात येणार आहे. तसेच या वयोगटातील मुलांना केवळ कोव्हॅक्सीन लस देण्यात येईल. त्यानंतर २८ दिवसानंतर दुसरा डोस देण्यात येईल. १ जानेवारी २००७ किंवा त्यापूर्वी जन्मलेले सर्व मुले लसीकरणासाठी पात्र आहेत. या वयोगटातील मुले दहावी आणि बारावीतील असल्यामुळे यांच्या लसीकरणासाठी खासगी शैक्षणिक संस्थांचे सहकार्य मिळाल्यास लसीकरण लवकर करून मुलांना सुरक्षित करता येईल. पालकांनी आपल्या मुलांना कोरोना प्रतिबंधात्मक लस देऊन सुरक्षित करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही यावेळी अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी केले.

१५ ते १८ वर्ष वयोगटातील मुलांच्या लसीकरणासाठी अशा प्रकारचा पहिला प्रयोग नागपूर शहरात करण्यात येत आहे. खासगी शैक्षणिक संस्थांनी आपल्या शाळेच्या परिसरात विद्यार्थ्यांचे लसीकरण शिबीर आयोजित करावे. लसीकरणाच्या ठिकाणी बसण्याची आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असावी. विद्यार्थ्यांसाठी लस, औषधी, नर्स, ऍम्ब्युलन्स, डॉक्टर्स तसेच इतर वैद्यकीय सुविधांची व्यवस्था मनपाद्वारे करण्यात येईल, असे यावेळी अतिरिक्त आयुक्त राम जोशी म्हणाले. पालकांच्या संमतीनेच मुलांचे लसीकरण करण्यात येणार आहे. लसीकरण केंद्रांवर गर्दी टाळण्यासाठी मुलांना टप्याटप्याने बोलावण्यात यावे. शिबिराच्या ठिकाणी लस घेतल्यानंतर मुलांची देखरेख करण्यासाठी डॉक्टर्स उपलब्ध राहतील आणि त्यांना अर्ध्या तासाने घरी सोडले जाईल असेही ते म्हणाले. चर्चेदरम्यान सर्व खासगी शैक्षणिक संस्थांच्या प्रतिनिधींनी साकारात्मक प्रतिसाद दिला असून १५ ते १८ वयोगटातील मुलांचे लसीकरण करण्यास पूर्ण सहकार्य करण्याची हमी यावेळी सर्वांनी दिली. 

दहावी व बारावीतील विद्यार्थ्यांना प्रथम प्राधान्य : फेब्रुवारी महिन्यात बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षा सुरु होणार आहेत. त्यामुळे दहावी व बारावीच्या परीक्षेसाठी अर्ज भरलेल्या विद्यार्थ्यांना लसीकरणासाठी प्रथम प्राधान्य द्यावे, अशी सूचना उपस्थित खासगी शैक्षणिक संस्थांच्या प्रतिनिधीं प्रा.जयंत जांभुळकर यांनी केली. या विद्यार्थ्यांचे लसीकरण पूर्ण झाल्यास परीक्षेच्या वेळी होणारी भीती कमी होईल. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात दहावीत शिकणाऱ्या मुलांचे लसीकरण करण्यात यावे, असेही प्रतिनिधींनी सूचित केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *