प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्या दुकानांवर मनपाची कारवाई
नागपूर समाचार : प्रतिबंधित प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्या दुकान, प्रतिष्ठानांविरोधात मनपाने कारवाई अधिक कठोर केली आहे. महाराष्ट्र शासनाद्वारे बंदी आणल्यानंतरही प्लास्टिक पिशव्यांचा वापर मोठ्या प्रमाणात होत असल्याचे निदर्शनास येताच मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या निर्देशानुसार उपद्रव शोध पथकाने कारवाईला गती दिली आहे. मनपा आयुक्तांच्या निर्देशानुसार बाजारपेठ, दुकान, भाजी बाजारात प्लास्टिक पिशवीमध्ये सामान देणाऱ्या दुकानांवर कारवाई करण्यात येईल व दंडही वसूल करण्यात येणार आहे.
बुधवारी (ता.५) धरमपेठ झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे प्रतिबंधित प्लास्टिक पिशवी संदर्भात कारवाई करण्यात आली. पथकाने धरमपेठ येथील चौधरी लाइफस्टाइल वर प्लास्टिक पिशवीच्या वापराबद्दल कारवाई करून ५ हजार रुपयांचा दंड वसूल केला. याशिवाय पथकाद्वारे कॉटन मार्केट येथील बंडू पत्रावळ दुकानावर कारवाई करून ५ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. मनपाद्वारे दररोज मनपा कर्मचारी, उपद्रव शोध पथकाचे जवान प्रत्येक बाजारपेठेत, भाजी मार्केट आणि अन्य ठिकाणी प्लास्टिक पिशवीचा उपयोग करणाऱ्या दुकानदारांच्या विरोधात कारवाई केली जाणार आहे.
कोव्हिड प्रतिबंधात्मक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गोरेवाडा रिंग रोड येथील के.आर.सी. लॉनवर कारवाई करीत उपद्रव शोध पथकाने १५ हजार रुपयांचा दंड वसूल केला. उपद्रव शोध पथकाने बुधवारी ६ प्रतिष्ठानांवर कारवाई करून ५५ हजार रुपयांचा दंड वसूल केला.
याशिवाय उपद्रव शोध पथकाने धरमपेठ झोन अंतर्गत सचिन पतंग भांडार मधून ५० प्लास्टिक पतंग जप्त केल्या व २ हजार रुपयांचा दंड वसूल केला. पथकाने ५६ पतंग दुकानांची तपासणी केली. उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात कारवाई करण्यात आली.