नाना पटोले यांची काँग्रेसने अध्यक्ष पदावरून हकालपट्टी करावी : आ. बावनकुळे
नागपूर समाचार : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सोमवारी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात केलेले आक्षेपार्ह विधान आणि जीव मारण्याच्या कारस्थानांना दिलेला पाठिंबा लक्षात पटोले यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी, तसेच काँग्रेसने पटोले यांना अध्यक्षपदावरून हाकलून द्यावे अशी मागणी आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.
यावेळी कार्यकर्त्यांनी नाना पटोले यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करून वातावरण अधिक तापवले होते. नानावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी आज आ. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात जिल्ह्यातील भाजपा कार्यकर्त्यांनी कोराडी पोलिस ठाण्यासमोर तीव भावना व्यक्त करीत आंदोलन केले. पटोले यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याशिवाय आम्ही येथून हटणार नाही, असा आग्रह आ. बावनकुळे यांनी पोलिसांकडे व्यक्त केला. कार्यकर्त्यांनी यावेळी नाना पटोले मुर्दाबाद, निषेधाच्या घोषणा देत आपला निषेध व्यक्त केला.
यावेळी बोलताना आ. बावनकुळे म्हणाले- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याचे कारस्थान-षडयंत्र करणाऱ्यांना पटोले सहकार्य करीत असल्याचा हा प्रकार आहे. जमाव तयार करून मोदींच्या विरोधात जाणूनबुजून बोलणे आणि वातावरण दूषित करण्याचा पटोलेंचा हा प्रयत्न आहे. हा प्रयत्न आम्ही हाणून पाडल्याशिवाय राहणार नाही.
या संदर्भात पटोलेंनी नंतर खुलासेवजा केलेल्या वक्तव्यावर आ. बावनकुळे म्हणाले- मोदी नावाच्या गावगुंडाबाबत मी बोलले असे नाना पटोले म्हणाले. साकोलीत असा एकही मोदी नावाचा गुंड नाही. अशा नावाचा गुंड असेल तर पटोलेंनी 3 दिवसात त्याला जनतेसमोर आणि माध्यमांसमोर उभे करावे असे आव्हानही आ. बावनकुळे यांनी दिले. नाना पटोले हे खोटे आहे.
नानावर गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांनी आम्ही 7 मागण्यांचे निवेदन दिले आहे. या सातही मागण्यांवर गुन्हा दाखल झाल्यानंतरच आम्ही येथून जावू. नाना पटोले यांची पंतप्रधान मोदींवर टीका करण्याची उंची नाही. काँग्रेसने त्यांची त्वरित अध्यक्षपदावरून हकालपट्टी करावी अशी मागणीही आ. बावनकुळे यांनी केली आहेत.