स्थापत्य समिती सभापती राजेंद्र सोनकुसरे यांचे निर्देश
नागपूर समाचार : कोरोना काळात नगरसेवकांना त्यांच्या वार्डात चेंबर, सिवरलाईनच्या देखभाल आणि दुरुस्तीची कामे करता आली नसल्यामुळे नागरिकांना खूप त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे या कामांना प्राधान्य देऊन प्रलंबित असलेली कामे तात्काळ पूर्ण करण्यात यावे, असे निर्देश स्थापत्य समिती सभापती राजेंद्र सोनकुसरे यांनी संबंधित विभागाला दिले.
स्थापत्य व प्रकल्प विशेष समितीची बैठक नुकतीच घेण्यात आली. बैठकीत सभापती राजेंद्र सोनकुसरे, उपसभापती निशांत गांधी, सदस्या आशा उईके, वंदना चांदेकर, कार्यकारी अभियंता मनोज तालेवार, उपअभियंता आदी उपस्थित होते.
यावेळी कार्यकारी अभियंता मनोज तालेवार यांनी शहरात सुरु असलेल्या कामांची माहिती दिली. नाग नदी पुनरुज्जीवन प्रकल्पांतर्गत शहरात नॉर्थ, सेंट्रल व साऊथ सिवरेज झोन अंतर्गत सिवरेज ट्रीटमेंट प्लॉन व शिवार लाईनचे काम केले जाणार आहे. त्याचे डिझाईन तयार करण्यात आले आहे. शहरात सिवर लाईन आणि चेंबर देखभाल व दुरुस्तीचे काम सुरु आहे. प्रभाग ३४ मध्ये ६१ लाखाचे प्रस्ताव तयार करण्यात आले असल्याची माहिती त्यांनी दिली.
शहरातील अनेक भागातील ट्रँक लाईन जीर्ण झालेल्या असून त्या नव्याने टाकण्याकरिता ट्रँक लाईनचा वेगळा प्रस्ताव शासनाला पाठविण्यात यावा तसेच प्रभागनिहाय सिवर लाईन आणि चेंबर देखभाल दुरुस्तीची जी कामे सुरू आहेत त्याची यादी समितीला देण्याचे निर्देश राजेंद्र सोनकुसरे यांनी दिले.
शहरात असलेल्या सिवरलाईनवरील अतिक्रमणावर प्रशासनाद्वारे करण्यात आलेल्या कार्यवाही बाबतही त्यांनी यावेळी विचारणा केली. कोरोना काळात नगरसेवकांना त्यांच्या वार्डात चेंबर, सिवर लाईनची कामे करता आली नसल्याने नागरिकांना खूप त्रास सहन करावा लागला. कामाच्या अनुषंगाने नस्ती तयार न केल्याने बऱ्याच ठिकाणची कामे प्रलंबित राहिली. नसती तयार न करणाऱ्या कनिष्ठ अभियंत्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे निर्देशही त्यांनी दिले.